किल्ले पारगड ते मोर्ले रस्ताकाम वन विभागाने रोखले! काय आहे कारण? - चंदगड लाईव्ह न्युज

17 January 2022

किल्ले पारगड ते मोर्ले रस्ताकाम वन विभागाने रोखले! काय आहे कारण?

पारगड ते मोर्ले, घोटगेवाडी पासून गोव्याला जोडणाऱ्या याच रस्त्याचे काम वनविभागाने थांबवले आहे.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

            बांधकाम विभागाच्या वेळकाढूपणा मुळे रखडलेले किल्ले पारगड ते मोर्ले रस्ताकाम आता वन विभागाच्या विरोधामुळे पुन्हा अडचणीत आले आहे. या रस्त्याला केंद्र सरकारची मुदतवाढ घेऊन तो 'पंतप्रधान ग्रामसडक' योजनेतून पूर्ण करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रघुवीर शेलार (पारगड) व प्रदीप नाईक (मोर्ले) यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे.

        कोल्हापूर जिल्ह्याला गोवा व सिंधुदुर्ग जिल्ह्याशी जोडणारा एकही धोकादायकघाट नसलेला हा सर्वात सोयीस्कर मार्ग आहे. 'राजमार्ग १८७' क्रमांकाच्या या रस्त्याची मागणी गेल्या कित्येक पिढ्या सुरूच आहे. याकामी रघुविर शेलार व प्रदीप नाईक यांनी पंचक्रोशीतील मावळ्यांना एकत्र करून गेल्या वीस वर्षात २८ उपोषणे, मंत्र्यांना घेराव तसेच धरणे आंदोलने केली. २०१७ पासून रडतखडत सुरू असलेले रस्त्याचे काम वनविभागाने दिलेल्या मुदतीत पूर्ण न झाल्याने तसेच यासंदर्भात बांधकाम विभाग व महाराष्ट्र शासनाने वेळीच मुदतवाढ न घेतल्याने उर्वरित कामावर वनविभागाकडून आक्षेप घेण्यात आला आहे. शिवकालीन पारगड व किल्ल्याच्या  परिसरातील सात-आठ गावातील ग्रामस्थ वर्षानुवर्षे अठराविश्वे दारिद्र्यात खितपत पडले आहेत. या रस्त्यामुळे आपल्या भाकरीची काहीतरी व्यवस्था होईल अशी भाबडी आशा त्यांना लागून राहिली आहे. तथापि वेळीच मुदतवाढ न घेतल्याने पेच प्रसंग निर्माण झाला आहे. याबाबत रघुवीर शेलार यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती व ना. राणे यांना निवेदनाद्वारे केंद्र शासनाकडून याकामी मुदतवाढ मिळवून द्यावी. तसेच राज्य शासनाने याकामी निधी न दिल्यास हा रस्ता पंतप्रधान ग्रामसडक मधून पूर्ण करावा. अशी मागणी केली आहे.

            अशाच प्रकारचे निवेदन  भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार नितेश राणे, भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली आदींना देऊन लक्ष वेधले आहे.

No comments:

Post a Comment