दुकानात वाईन विक्रीस विरोध, चंदगड शिवप्रतिष्ठानचे तहसीलदारांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

17 February 2022

दुकानात वाईन विक्रीस विरोध, चंदगड शिवप्रतिष्ठानचे तहसीलदारांना निवेदन

किराणा दुकान, मॉलमध्ये दारू विक्री करू नये या आशयाचे निवेदन तहसीलदार यांना देताना शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते.

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

           किराणा मालाच्या दुकानात वाईन विक्री करण्यास परवानगी देणारा महाराष्ट्र शासनाचा निर्णय समाजविघातक असल्याचे सांगून तो रद्द करावा. या मागणीसाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चंदगड तालुका शाखेच्या वतीने तहसीलदार विनोद रणवरे यांना नुकतेच निवेदन देण्यात आले.

           शासनाचा हा निर्णय एकतर्फी व दुर्दैवी असून वाईन अर्थात दारू अशा पद्धतीने विक्री करून शासन काय साधणार आहे? असा सवाल करत राज्यात एका बाजूला घरातील कर्त्या पुरुषाच्या दारूबाजपणाला वैतागलेल्या माता-भगिनी रस्त्यावर येऊन आंदोलन करत आहेत. तर दुसरीकडे शासनाच्या या निर्णयामुळे घरातील मुलांनाही वाईन म्हणजे दारू सहज उपलब्ध होणार असून मुलेही दारूच्या आहारी जाण्याची भीती व्यक्त केली आहे. एकीकडे चांगले संस्कार करण्याची सक्ती शाळांमध्ये करायची तर दुसरीकडे त्याच मुलांना सहज दारू उपलब्ध करून द्यायची. हा दुटप्पीपणा आहे. शेतकऱ्यांचा विकास करण्याच्या नावाखाली बडी राजकीय धेंडे या धंद्यातून आपली पोळी भाजून घेऊ पहात आहेत हे थांबले पाहिजे. असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर शिवप्रतिष्ठानच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

No comments:

Post a Comment