होसूरच्या ममताचा अपघाती मृत्यू, लक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभूमीवर या घटनेमुळे गावावर शोककळा, कोठे घडली घटना वाचा सविस्तर... - चंदगड लाईव्ह न्युज

14 February 2022

होसूरच्या ममताचा अपघाती मृत्यू, लक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभूमीवर या घटनेमुळे गावावर शोककळा, कोठे घडली घटना वाचा सविस्तर...

 

ममता विठ्ठल  व्हडगे

कागणी : एस. एल. तारिहाळकर

चंदगड व बेळगाव तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या होसूर (ता. चंदगड) येथील तरुणी ममता विठ्ठल  व्हडगे (वय २३) हिचा भावासोबत दुचाकीवरून जात असताना रविवारी दि. १३ रोजी सायंकाळी कागणी-कोवाड रस्त्यावर झालेल्या अपघातात जखमी होऊन सायंकाळी मृत्यू झाला. तर दुचाकीचा चालक व ममता हिचा लहान भाऊ कोणेरी हा जखमी झाला. होसूर येथे पाच वर्षानंतर लक्ष्मी यात्रा मंगळवार दि. १५ पासून सुरू होत आहे. या यात्रेच्या एक दिवस अगोदर अन्  यात्रेसाठी आवश्यक भांड्यांची खरेदी करून कोवाडहून होसूरला सायंकाळी ६ वाजता जात असतानाच कोणेरी याचा दुचाकी होंडा ॲक्टिव्हा वरील ताबा सुटून झालेल्या अपघातांमध्ये ममता हिचा मृत्यू झाला. सोमवारी सकाळी तिच्यावर होसूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या पश्चात आई-वडील, दोन मोठ्या बहिणी, एक लहान भाऊ, काका असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवारी दि. 15 रोजी सकाळी होणार आहे. ममता हिने कोवाड येथील कला महाविद्यालयात बी. ए. पर्यंत शिक्षण घेऊन दोन महिन्यापूर्वी पुणे येथे एका खासगी कंपनीमध्ये कामाला प्रारंभ केला होता. तिचा भाऊ कोणेरी गोवा येथे नोकरीला आहे. ममता ही पुण्याहून रविवारी सकाळी होसूर येथे आली होती तर कोणेरी हा चार दिवसापूर्वी गावाकडे यात्रेसाठी आला आहे. दोघे बहिण-भाऊ खरेदीसाठी कोवाड येथे गेले होते.  ममता हिच्या घरी लक्ष्मी यात्रेची तयारी सुरू असतानाच ममता चा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखद प्रसंग ओढवला गेला. 

दुचाकीवरून पाठीमागं बसवून घेऊन जात असताना कागणी गावाजवळ जनार्दन देसाई यांच्या गॅरेजजवळील वळणावर सदर अपघात घडला. यात्रेच्या एक दिवस अगोदर या दू : खद घटनेमुळे गावावर  शोककळा पसरली आहे. 

चंदगड पोलिसात या घटनेची नोंद झाली असून कोवाड पोलीस चौकीचे पोलीस नाईक राज किल्लेदार अधिक तपास करत आहेत.4 comments:

Unknown said...

भावपूर्ण श्रद्धांजली ममता💐

Unknown said...

Rip

Unknown said...

RIP

Unknown said...

RIP

Post a Comment