विद्यार्थांना सुवर्णसंधी! 'अक्षरयात्री' मोहन कांबळे यांच्या अक्षर दालनाचे कालकुंद्रीत उद्या प्रदर्शन - चंदगड लाईव्ह न्युज

13 March 2022

विद्यार्थांना सुवर्णसंधी! 'अक्षरयात्री' मोहन कांबळे यांच्या अक्षर दालनाचे कालकुंद्रीत उद्या प्रदर्शन

 


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
     'सुंदर अक्षर हा एक मौल्यवान दागिना आहे.' असा सुविचार प्रचलित आहे. तथापि हा मौल्यवान दागिना सर्वांनाच मिळत नाही. ही कष्टसाध्य कला कालकुंद्री येथील मोहन गुरुनाथ कांबळे याने परिश्रमपूर्वक साध्य केली आहे. मोहन कांबळे हा सध्या स्वामी विवेकानंद महाविद्यालय कोल्हापूर येथे तीन वर्षाचा ग्राफिक डिझायनर कोर्स करत असून यंदा पहिल्या वर्षात शिकत आहे. घर परिवारात कोणीही सुशिक्षित नाही. घरची अठराविश्वे गरीबी; या खडतर परिस्थितीतून पहिली ते चौथी केंद्रीय प्राथमिक शाळा कालकुंद्री, पाचवी ते बारावी श्री सरस्वती विद्यालय कालकुंद्री येथे त्यांने शिक्षण पूर्ण केले. प्राथमिक शाळेत असताना कोरीव हस्ताक्षर काढण्याची त्याची सवय आजच्या पिढीला हस्ताक्षरातील मार्गदर्शक उदाहरण ठरणारी आहे. गेल्या तीन-चार वर्षात त्याने स्वहस्ताक्षरात लिहिलेले विविध साहित्य 'मी अक्षरयात्री' या प्रदर्शनाच्या माध्यमातून सर्वाना पाहण्यास उपलब्ध होणार आहे.
       कालकुंद्री येथील 'श्री कलमेश्वर अखंड नाम सप्ताह'चे औचित्य साधून केंद्रीय प्राथमिक शाळा कालकुंद्री येथे उद्या दि. १४ रोजी दुपारी १.०० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. हे प्रदर्शन दिनांक १४ ते १६ मार्च अखेर तीन दिवस सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध राहणार असून ही चंदगड तालुका व परिसरातील शिक्षक पालक व विद्यार्थ्यांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. याचा लाभ घेऊन मोहन कांबळे याला प्रोत्साहन द्यावे. असे आवाहन मोहन कांबळे यांचे मार्गदर्शक सुभाष बेळगावकर (मुख्याध्यापक, सरस्वती विद्यालय) व संयोजकांनी केले आहे.
No comments:

Post a Comment