विधवा प्रथा बंदीची आजरा तालुक्यातील किणे येथून सुरवात, कातकर कुंटूंबियाकडून सुरवात - चंदगड लाईव्ह न्युज

24 May 2022

विधवा प्रथा बंदीची आजरा तालुक्यातील किणे येथून सुरवात, कातकर कुंटूंबियाकडून सुरवात


तेऊरवाडी (एस. के. पाटील)
गडहिंग्लज तालूक्यातील नेसरी येथील छ. शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे माजी प्राचार्य व किणे (ता. आजरा) येथील रहिवासी कृष्णा गोविंद कातकर यांच्या निधनानंतर कातकर कुटुंबाने विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला. पती निधनानंतरही पत्नी विद्याताई कातकर यांचे मंगळसूत्र,
कुंकू, जोडवी काढण्यात आली नाहीत.  कातकर कुटुंबियांचा हा निर्णय सर्वाना प्रेरणादायी असाच आहे.
 माजी प्राचार्य कृष्णा कातकर यांचे सोमवार (दि. २३) रोजी सकाळी निधन झाले. ही घटना समजताच कातकर यांचे "नातेवाईक व गडहिंग्लज पंचायत समितीचे माजी उपसभापती विद्याधर गुरबे हे किणे येथे दाखल झाले.  श्री गुरबे यांना यावेळी विधवा प्रथा बंदीचा उपक्रम राबविला जाऊ शकतो हे लक्षात आले. त्यांनी सर्वप्रथम कातकर यांच्या कुटुंबांतील बहीण, नणंद, भावजय, पुतणे, मुले यांना एकत्र करून हा उपक्रम राबविण्याबाबत विश्वासात घेतले. त्यांना विधवा प्रथा बंदीबाबत माहिती दिली. तसेच सुशिक्षित लोकांनी अनिष्ठ चाली, रूढी, परंपरा बंद करण्याबाबत गुरवे यांनी प्रबोधन केले. कुटुंबांना हा उपक्रम राबविण्याबाबत सहमती दर्शविली. यानंतर सर्व नातेवाईकांना व ग्रामस्थांना हा उपक्रम राबविण्यात येणार नवा पायंडा असल्याचे सांगितले. यानंतर कृष्णा कातकर यांच्या अत्यंविधी प्रसंगी माजी प्राचार्य एस. एस. मटकर यांनी विधवा प्रथा बंदी उपक्रम राबविण्यात येणार असल्याची सूचना केली. त्याला समस्त किणे ग्रामस्थांच्या वतीने आजरा पंचायत समितीचे माजी सभापती विष्णूपंत केसरकर व माजी सभापती मसणू सुतार यांनी सहमती दिली. यानुसार कातकर यांच्या अंत्यविधी करण्यात आले. मात्र त्यांच्या पत्नी विद्याताई कातकर यांचे मंगळसुत्र , कुंकू , जोडवी काढण्यात आली नाहीत . विद्याताई यांनी मंगळसूत्र , कुंकू , जोडवी या माध्यमातून आपण पतीच्या आठवणी जपणार असल्याचे सांगितले . कातकर कुटूंबियांचा हा निर्णय सर्वांना प्रेरणादायी असाच आहे.

No comments:

Post a Comment