मोरेवाडी गावची गावठाण हद्दवाढ करण्याची ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी, बोंजूर्डी ग्रामपंचायतीने ग्रामसभा ठराव देणे आवश्यक - चंदगड लाईव्ह न्युज

07 May 2022

मोरेवाडी गावची गावठाण हद्दवाढ करण्याची ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी, बोंजूर्डी ग्रामपंचायतीने ग्रामसभा ठराव देणे आवश्यक

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

                बोंजूर्डी गृप ग्राम पंचायती अंतर्गत मोरेवाडी (ता . चंदगड ) जि . कोल्हापुर येथील  मोरेवाडी गावची गावठाण हद्दवाड करण्याची मागणी मोरेवाडी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, तहसिलदार व बोंजूर्डी ग्रामपंचायतीकडे ग्रामस्थानी निवेदनाद्वारे केली आहे.

                                                                                        जाहिरात

जाहिरात

           चंदगड तालुक्यातील डोंगराळ व अतिपावसाळी विभागात येत असलेल्या मोरेवाडी गावच्या लोकसंखेत वाढ झाल्यामुळे व गावातील गावठाणातील जागा संपल्याने गावातील अनेक लोकांनी नैसर्गिक वाढीसाठी गावठाणाजवळील शेतजमीनीमध्ये, गावठाण हद्दीपासुन ५०० मीटरच्या आत परंतु गावठाण क्षेत्राबाहेर घरे बांधलेली आहेत. सदर घरामध्ये गेल्या २० ते २५ वर्षापासुन लोक राहत आहेत . सहाजिकच गावची नैसर्गिक वाढ झालेली आहे . शेतजमीनीत 'एनए' (N.A.) न करताच बांधलेल्या या घरांची केवळ करांसाठी (घरपट्टी) ग्रामपंचायत दप्तरी नोंद आहे. ही घरे कायदेशीर गावठाणात यावीत यासाठी अजुनपर्यंत कोणीही प्रयत्न केलेले दिसुन येत नाहीत. खरे तर दर दहा वर्षांनी जनगणना झाल्यावर वाढीव लोकसंख्या आणि गावाशेजारील गावठाण व्यतिरिक्त जागेत बांधलेली घरे यांचा आढावा घेऊन गावठाण योजने अंतर्गत ग्रामपंचायतीने महसुल प्रशासनाला वाढीव गावठाण मंजुर करण्याचा प्रस्ताव देणे गरजेचे असते. सन २०११ च्या जनगणनेनुसार मोरेवाडी गावची लोकसंख्या वाढलेली असुन , बेघरांची संख्याही कमालीची वाढलेली दिसुन येते. परंतु देशाला स्वातंत्र्य मिळुन ७५ वर्षे झाली व आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला असताना गावठाण वाढ झाली नसल्यामुळे व जागेच्या कमतरतेमुळे  मोरेवाडी गावातील गरीब बेघरांना आजपर्यंत घरकुलांचा लाभ मिळाला नाही. गावातील गरीब, बेघरांना घरकुल योजनांच्या माध्यमातुन घराचा लाभ देताना येणारी जागेची अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे नाईलाज म्हणून शेतकरी नैसर्गिक वाढीमळे 'एनए' (N.A.) न करताच शेतजमीनीमध्ये  घरे बांधत आहेत.  

            या शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी गावठाण विस्तार आवश्यक असल्याने, गावठाण हद्दवाढ करण्याबाबत जिल्हाधिकारी कोल्हापुर यांना शासनाच्या आपले सरकार या ऑनलाईन तक्रार निवारण पोर्टलवर तक्रार दाखल केली होती. सदर तक्रारीच्या अनुषंगाने तहसिलदार चंदगड यांनी गट विकास अधिकरी चंदगड यांचेकडील अहवालानुसार संदर्भाधिन पत्रान्वये कळविण्यात आले आहे. यामध्ये  गावठाण हद्द वाढ करण्याबाबत ग्रामस्थरावर ग्रामसभा घेऊन त्या विषयावर चर्चा करण्यात येईल असे सुचविले आहे. त्यामुळे बोंजूर्डी ग्रामपंचायतीने गावठाण वाढ करण्याबाबत ग्रामसभेमध्ये ठराव मांडुन ग्रामपंचायतीकडून पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मोरेवाडी  ग्रामस्थांच्या वतीने विनंती केली आहे.

No comments:

Post a Comment