कोवाड येथे विधवा सन्मान सोहळ्यात उपस्थित विधवा. |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
कोणत्याही धर्मग्रंथात नवरा मेलेल्या बाईने विधवेचे जीवन जगावे, तिला विद्रूप करावे, असे लिहिलेले नाही ही प्रथा बंद करावी यासाठी ५०० वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत. तथापि आता समाज जागा होतोय ही चांगली गोष्ट आहे. असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब मुल्ला यांनी केले. ते कोवाड ग्रामपंचायत आयोजित विधवा सौभाग्य- सन्मान सोहळा कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच सौ अनिता भोगण होत्या.
मार्गदर्शन करताना जि. प. सदस्य कल्लाप्पा भोगण सोबत मान्यवर. |
विधवा महिलांना पुन्हा सौभाग्य अलंकार वापरण्यास संमती देऊन त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारी कोवाड ही चंदगड तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. यावेळी बोलताना चंदगडचे नूतन पोलीस निरीक्षक संतोष घोळवे म्हणाले विधवांनी न केलेल्या चुकीची शिक्षा त्यांना देणे अन्यायकारक आहे. ही प्रथा बंद झाली पाहिजे. त्याची प्रत्यक्ष सुरुवात करणाऱ्या कोवाड ग्रामपंचायतीचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच असून यापुढे विधवांना सौभाग्यवती प्रमाणेच मान मिळाला पाहिजे. गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे म्हणाले कोवाड ग्रामपंचायत चा क्रांतिकारी निर्णय महाराष्ट्राला दिशादर्शक ठरेल.
जिल्हा परिषद सदस्य कल्लाप्पा भोगण म्हणाले कोवाड मध्ये उद्यापासून कोणत्याही कार्यक्रमात गावातील विधवा महिला सौभाग्यवती असल्याचे समजून वावरेल. शुभकार्य प्रसंगी पूर्वीप्रमाणेच तिला मान मिळेल असे सांगितले. यावेळी एम व्ही पाटील, राजश्री पचंडी, रंजना पाटील, सुवर्णा केसरकर आदींची भाषणे झाली. कार्यक्रमास उपसरपंच पुंडलिक जाधव, केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत पाटील, ग्रामसेवक जी एल पाटील, वसंत व्हन्याळकर, आप्पा वांद्रे, अशोक मनवाडकर, विष्णू आडाव सर्व ग्रामपं सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग जाधव यांनी केले. आभार मानताना सरपंच अनिता भोगण म्हणाल्या कोणत्याही शुभकार्य प्रसंगी वावरताना यापुढे विधवा महिलांनी संकोच करू नये, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत.
कार्यक्रमापूर्वी सकाळी गावातून महिलांची डोक्यावर कलश घट घेऊन वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यात सर्व जाती-धर्माच्या २५० विधवा महिला उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या.
No comments:
Post a Comment