किल्ले पारगड ' वर ५ जून रोजी अंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॅरेथॉन स्पर्धेचा थरार! धावपटूंसाठी ठरणार रोमांचक अनुभव, कशी आहे स्पर्धा........... - चंदगड लाईव्ह न्युज

15 May 2022

किल्ले पारगड ' वर ५ जून रोजी अंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॅरेथॉन स्पर्धेचा थरार! धावपटूंसाठी ठरणार रोमांचक अनुभव, कशी आहे स्पर्धा...........

संग्रहित छायाचित्र


संपत पाटील / चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

          निसर्ग पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर निसर्ग संवर्धन, लोक प्रबोधनासाठी पारगड हेरिटेज रन (अर्ध मॅरेथॉन स्पर्धा) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. किल्ले पारगड जनकल्याण संस्था मुंबई, पारगड, मिरवेल, नामखोल ग्रुप ग्रामपंचायत, ऑल्टिट्यूड क्वेस्ट ॲडव्हेंचर एल एल पी, आउट प्ले स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ५ जून २०२२ रोजी होणारी स्पर्धा देशभरातील धावपटूंसाठी एक आव्हान ठरणार आहे. शिवाय छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्यावरून स्पर्धेत सहभागी होण्याचा रोमांचकारी अनुभव ठरु शकतो.

         स्पर्धा 'जॉय ऑफ जंगल' (५ किमी) 'जंगल ड्रीम रन' (१० किमी) व 'जंगल हाफ मॅराथॉन' (२१ किमी) धावणे अशा तीन श्रेणीमध्ये पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र आहे. पारगड हेरिटेज रन 'निसर्गाचे रक्षक' मोहिमेअंतर्गत नैसर्गिक संवर्धन, वृक्ष लागवड, पाणी संवर्धन, कचऱ्याचे पुनर्विनीकरण, नैसर्गिक ऊर्जा कार्यक्षमता या पाच उद्दिष्टांवर प्रबोधन करणार आहे.

           स्पर्धा वेळापत्रक पुढील प्रमाणे - ५ जून २०२२ सकाळी ४ पर्यंत स्पर्धकांचे आगमन, ५ वाजता कार्यक्रमाची संक्षिप्त माहिती नाष्टा, ५.३० उद्घाटन, ६ वाजता २१ किमी जंगल हाफ मॅरेथॉन, (महिला), ६.१५ - २१ किमी (पुरुष). ६.३० वाजता १० किमी जंगल ड्रीम रन (महिला), ६.४५ जंगल ड्रीम रन (पुरुष). ७.०० वा. ५ किमी जॉय ऑफ जंगल (महिला), ७.१५ जॉय ऑफ जंगल (पुरुष). सकाळी ९ ते ११ वाजता मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण, मार्गदर्शन व परिसरात वृक्षारोपण होणार आहे. यावेळी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील, चंदगडचे न्यायाधीश ए. सी. बिराजदार, उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे, तहसीलदार विनोद रणवरे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे आदींची उपस्थिती असणार आहे. 

            स्पर्धेची सुरुवात व सांगता भवानी मंदिर पारगड येथे होणार असून स्पर्धा मार्गावर पहिला चेक पॉईंट विठ्ठल रुक्मिणी मंदिर नामखोल, दुसरा चेक पॉईंट सातेरी मंदिर तेरवण, अंतिम चेक पॉईंट राम घाट येथे ठेवण्यात आला आहे. स्पर्धकांनी चेक पॉईंटवर आपले स्टिकर लावून परत येणे बंधनकारक आहे. ४ जून रोजी  येणाऱ्या स्पर्धक व समर्थकांसाठी किल्ल्यावर भोजन व राहण्याची सोय सशुल्क करण्यात आली आहे.

     स्पर्धा मार्गावर रुग्णवाहिका, वैद्यकीय सुविधा, रेस मार्शलच्या नजरेखालील चेक पॉईंट, पिण्याचे पाणी व केळी आदी सुविधा उपलब्ध राहतील.

        कोल्हापुर जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालये, क्रिडा मंडळ, क्रिडा प्रशिक्षण केंद्रे व संस्थांतील तीन निवडक स्पर्धकांना विनामूल्य प्रवेश असून त्यापेक्षा अधिक स्पर्धकांसाठी प्रवेश शुल्क लागू राहील. शारीरिक शिक्षकांनी निवडक स्पर्धकांचे फार्म outplaysportsfoundation@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवावेत. असे आवाहन स्पर्धा प्रमुख प्रवीण चिरमुरे व किल्ले पारगड जनकल्याण संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. स्पर्धकांनी अधिक माहीतीसाठी 9987322227 / 7021074762 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment