कोवाड येथे विजेचा धक्का बसून बेकिनकेरेचा सेंट्रिग कामगार ठार, दोघे जखमी - चंदगड लाईव्ह न्युज

01 June 2022

कोवाड येथे विजेचा धक्का बसून बेकिनकेरेचा सेंट्रिग कामगार ठार, दोघे जखमी

संदीप मल्लाप्पा हुंदरे

कागणी :  सी. एल. वृत्तसेवा

मटन दुकानाच्या इमारतीच्या स्लॅबसाठी सेंट्रिंगचे काम सुरू असताना इमारतीवरून गेलेल्या वीज वाहक तारांचा स्पर्श झाल्याने बेकिनकेरे (ता. बेळगाव) येथील एक सेंट्रिंग कामगार जागीच ठार झाला. तर अन्य दोघे जण जखमी झाले आहेत. सदर घटना कोवाड बुधवारी दि. १ रोजी दुपारी २ वाजता घडली.

 याबाबत अधिक माहिती अशी की, कोवाड (ता. चंदगड) येथे बाजारपेठेला लागून ताम्रपर्णी नदी आहे. या नदीच्या  पात्राला लागून बाळू घोडगे यांचे न्यूशांत मटन दुकानाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. पहिल्या मजल्याच्या स्लॅबचे सेंट्रींग काम करण्यासाठी येथे इमारतीवर ३ कामगार होते. स्लॅबसाठी लागणारा बीम उचलून वर घेत असताना उच्च वीज वाहक तारेला स्पर्श झाला. यावेळी संदीप मल्लाप्पा हुंदरे (वय २१ , रा. बेकिनकेरे) हा वीज धक्का बसताच इमारतीवरून खाली पडला. त्याचा जागीच मृत्यू झाला. तर शेजारी असणारे कृष्णा बाळू भोगण (वय २५, रा. बेकिनकेरे), नारायण यल्लाप्पा चोपडे (वय २१, रा. बेकिनकेरे) हे दोघे जण विजेचा धक्का बसल्याने जखमी झाले.

संदीप यांच्या मृतदेहाचे   चंदगड येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून चंदगड पोलिस अधिक तपास करत आहेत.

संदीप याच्या पश्चात आई-वडील, तीन बहिणी असा परिवार आहे. तो अविवाहित असून त्यांची घरची परिस्थिती बेताचीच आहे. जखमीवर बेळगाव तसेच अन्य ठिकाणी खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत संदीपचे वडील यांनी पोलिसांत फिर्याद दिली असून मटन दुकान मालक बाळू घोडगे व कृष्णा भोगण  या दोघांच्यावर संदीप याच्या मृत्यूला जबाबदार धरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



No comments:

Post a Comment