द्वारका येथे भक्त निवास इमारतीचा गृहप्रवेश, मराठी माणसांनी बांधली भव्य इमारत - चंदगड लाईव्ह न्युज

24 June 2022

द्वारका येथे भक्त निवास इमारतीचा गृहप्रवेश, मराठी माणसांनी बांधली भव्य इमारत

द्वारका ( गुजरात) येथे महाराष्ट्र मंडळ द्वारका यांच्या प्रयत्नातून साकारलेली भव्य भक्त निवास इमारत.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

            महाराष्ट्र मंडळ द्वारका (रजिस्टर ट्रस्ट) यांच्या पुढाकाराने द्वारका येथे येणाऱ्या भाविकांसाठी विशेषतः मराठी भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या आलिशान भक्तनिवास इमारतीच्या पहिल्या मजल्याचा वास्तुशांती, गृहप्रवेश कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.

        श्री कृष्णाची राजधानी द्वारका ही देवभूमी म्हणून ओळखली जाते. येथील तसेच समुद्रातील बेटावर स्थित द्वारकाधिश मंदिराला देश-विदेशातून लाखो भाविक दरवर्षी भेट देत असतात. या ठिकाणी अनेक जाती, धर्म, पंथांनी त्या-त्या समाजासाठी भक्त निवासे बांधली आहेत. तथापि मराठी व महाराष्ट्रीयन भाविक, पर्यटकांसाठी भक्त निवास किंवा राहण्याची सोय नसल्यामुळे त्यांची  मोठ्या प्रमाणात आर्थिक लुबाडणूक होते. हे ओळखून गुजरात स्थित महाराष्ट्रीयन मंडळींनी महाराष्ट्र मंडळ द्वारका हे रजिस्टर विश्वस्त मंडळ स्थापन केले. 

          मूळ आराखड्यात पाच मजली सर्व सोयींनी युक्त भक्त निवास बांधण्याचे ध्येय असले तरी मंडळाला महाराष्ट्रातून देणगीदारांचा प्रतिसाद लाभला नाही. परिणामी गेल्या तीन-चार वर्षात या मंडळाचे अथक परिश्रम व गुजरात मधीलच महाराष्ट्रीयन देणगीदारांच्या सहकार्याने दहा खोल्या व एक हॉल असलेला पहिला मजला पूर्ण करता आला. त्याचा गृहप्रवेश नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी मंडळाचे विश्वस्त एल डी वाघमारे,  सुरेश सोनार, सुशील कोरेगावकर, डॉ. राजेश कल्लाप्पा पाटील, मनीष परलीकर,  नारायण गद्रे, अनिल पाटील, कमलेश चौहान आदी विश्वस्तांसह  विविध जिल्ह्यांतून अखिल सौराष्ट्र महाराष्ट्रीयन मंडळ व महाराष्ट्र मंडळांचे पदाधिकारी व मराठी बांधव उपस्थित होते.

        वरील मजल्यांच्या बांधकामासाठी अधिक निधीची गरज असून महाराष्ट्रातील देणगीदारांनी मदतीचा हात दिला तरच हे शक्य आहे. महाराष्ट्र, गुजरातसह जगाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या मराठी भाविक, पर्यटकांसाठी अत्यल्प मोबदल्यात निवास सुविधा उपलब्ध करून देता येईल. याकरिता महाराष्ट्राकडून मोठ्या अपेक्षा असून देणगीदारांनी पुढे यावे. असे आवाहन विश्वस्त मंडळाचे सचिव एल डी वाघमारे यांनी केले आहे. दिलेले दान '80 जी' अंतर्गत करसवलत प्राप्त असून देणगीची पावती देणगीदारापर्यंत पोहोचवली जाणार आहे.

आपले दान 'महाराष्ट्र मंडल द्वारका' (रजिस्टर ट्रस्ट) च्या  नावा ने करावे. 

SBI A/C No.36319363616 

IFSC Code : SBIN0060090

Reg. No. - E 183 / Devbhumi Dwarka

PAN - AAETM8146K

80G Exm No ITBA/EXM/80G/2019-20/ 1018337213 Dt 26-09-2019

       देणगीदारांनी देणगी जमा करताना आपला मोबाईल नंबर टाकून  9426467369 या  नंबरवर सचिव एल डी वाघमारे  यांना सूचित करावे. म्हणजे आपला पत्ता घेऊन पावती पाठवू शकतील.


No comments:

Post a Comment