सैनिकांच्या मुलींचे दहावी परीक्षेत नजरेत भरणारे यश - चंदगड लाईव्ह न्युज

23 June 2022

सैनिकांच्या मुलींचे दहावी परीक्षेत नजरेत भरणारे यश


वैष्णवी चव्हाण

कालकुंद्री  : सी. एल. वृत्तसेवा

          नुकत्याच निकाल जाहीर झालेल्या दहावी/ एसएससी परीक्षेत अन्य विद्यार्थ्यांसह देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या मुलींनीही उत्तुंग यश प्राप्त केले आहे. निपाणी येथील स्वातंत्र सैनिक कै. गोविंदमामा चव्हाण यांची नात व सुभेदार मेजर रवींद्र चव्हाण यांची कन्या वैष्णवी चव्हाण हिने इंग्रजी माध्यमातून ९१% गुण मिळवत शाळेत दुसरा क्रमांक पटकावला. ती सातारा येथील के. एस. डी. शानभाग विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. 

सपना केसरकर

         वैष्णवी हिचे वडील रविंद्र गोविंद चव्हाण गेली ३० वर्षे सैन्यदलात (१२ मराठा)कार्यरत आहेत. लहानपणापासून वडिलांपासून दूर असूनही सीमेवर शत्रूशी दोन हात करणाऱ्या वडील व आजोबांच्या कष्टाची जाणीव ठेवत स्वतः अभ्यास करून तिने मिळवलेले यश निश्चितच नजरेत भरणारे आहे. यशाबद्दल अनिस अकॅडमी पुणे चे प्रमुख मोहम्मद कुट्टी यांनी वैष्णवी हिचा  सत्कार केला.

दहावी परीक्षेतील यशाबद्दल वैष्णवी चे अभिनंदन करताना मोहम्मद कुट्टी सोबत वर्गशिक्षिका प्रिया.

            याशिवाय दक्षिण आफ्रिकेतील कांगो देशात भारतीय शांती सेनेतून (७ मराठा लाईट इन्फंट्री) सेवेत असलेले राजेंद्र केसरकर, आजरा, जि. कोल्हापूर यांची मुलगी सपना राजेंद्र केसरकर हिने ९३.२०% गुणांसह शाळेत तिसरा क्रमांक पटकावला. ती रोझरी इंग्लिश मीडियम स्कूल आजरा या शाळेची विद्यार्थिनी आहे. २६ वर्षे सैन्यात असलेले वडील गेली दोन वर्षे परदेशात (कांगो, दक्षिण आफ्रिका) असतानाही तिने हे कौतुकास्पद यश मिळवत वडिलांच्या कष्टाचे चीज केले आहे. 

               सैनिकांची अशी जिद्दी, मेहनती, कष्टाळू, कर्तुत्ववान व परिस्थितीची जाणीव ठेवणारी मुले सीमेवर शत्रूशी दोन हात करताना सर्वच सैनिकांना अधिक बळ देतात. असे गौरवोद्गार  दक्षिण आफ्रिकेत कांगो येथे शांतिसेना सोबत असलेले अधिकारी सुभेदार मेजर गजानन चव्हाण यांनी सी एल न्युजशी दूरध्वनीवरून बोलताना काढले. त्यांनी दहावी परीक्षेत यश मिळवलेल्या सर्वच सैनिकांच्या मुलांचे यावेळी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment