चंदगड मध्ये पावसाचा जोर अचानक वाढला...! पोलीस, प्रशासकीय यंत्रणा सतर्क - चंदगड लाईव्ह न्युज

17 July 2022

चंदगड मध्ये पावसाचा जोर अचानक वाढला...! पोलीस, प्रशासकीय यंत्रणा सतर्क

चंदगड आगाराजवळ आज मोठे झाड उन्मळून रस्त्यावर पडले.

चंदगड : सी एल वृत्तसेवा
चंदगड तालुक्यात आज १६ जुलै २०२२ रोजी पावसाचा जोर अचानक वाढल्यामुळे पोलीस व प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. गेले दोन दिवस पावसाचा जोर कमी असल्यामुळे नागरिक व प्रशासकीय यंत्रणेने सुटकेचा निःश्वास टाकला होता. हवामान विभागानेही तीन दिवसात पाऊस कमी राहील असा अंदाज व्यक्त केलेला असताना आज चंदगड तालुक्यात अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दुपारनंतर पावसाने थैमान घातले असून लहान मोठे ओढे, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. अनेक ठिकाणी ओढ्याचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. ताम्रपर्णी  नदीचे पाणी चार दिवसापासूनच बऱ्याच ठिकाणी पत्रा बाहेर पडले आहे. याची गंभीर दखल पोलीस, प्रशासन व चंदगड आगाराने घेतली आहे.
ताम्रपर्णी नदीचे पाणी मोठ्या प्रमाणावर चंदगड हेरे रस्त्यावर आल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

   ज्या रस्त्यावर, पुलावर, मोरीवर पाणी आले आहे किंवा नुकतेच येवून गेले आहे, अशा मार्गावर बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिस प्रशासन किंवा सार्वजनिक बांधकाम कडून ना हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतरच अशा मार्गावर बस सोडावी असे निर्देश चंदगड आगाराला देण्यात आले आहेत. ओढे, नाले यांचे पाणी रस्त्यावर येणे, रस्ता खचणे रस्त्यावर झाडे पडणे असे प्रकार वाढले असून अशा ठिकाणी एसटी थांबवणे भाग पडत आहे. अशा धोकादायक परिस्थितीतून गाड्या नेल्यास जीवित व वित्तहानी होण्याचा धोका आहे हे ओळखून सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. यामुळे सर्व शैक्षणिक संस्था, शाळा, कॉलेजचे विद्यार्थी, शिक्षक, नोकर वर्गासह प्रवाशांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
दरम्यान आज सायंकाळी गतवर्षी एका युवकाचा बळी घेतलेल्या ढोलगरवाडी, कडलगे नजीकच्या मोरीवर पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.

 
ताम्रपर्णी नदीचे पाणी मोठ्या प्रमाणावर चंदगड हेरे रस्त्यावर आल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

No comments:

Post a Comment