वडगाव- बेळगाव येथील अजित औरवाडकर यांनी रांगोळीतून साकारलेली विठू माऊली व वारकरी भक्ताची रांगोळी |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे वारकरी विठू नामाच्या गजरात तल्लीन झालेले असताना वडगाव- बेळगाव येथील रांगोळी कलाकाराने सर्व भक्तांना रांगोळी कलेतून आषाढी वारीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
गेली २ वर्षे करोना महासंकटाने वारकरी संप्रदाय विठू माऊलीच्या दर्शनापासून वंचित राहिला होता. यंदा कोरोनाचे संकट टळल्यामुळे वारकरी मंडळींचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. लाखो भाविक पंढरपुरात दाखल झाले असून उद्या दि. १० जुलै २०२२ रोजी पंढरपुरासह देशभर आषाढी एकादशी साजरी होत आहे. याचे औचित्य साधून रांगोळी कलाकार अजित महादेव औरवाडकर यांनी विठू माऊली व वारकरी भक्त यांची 'भेटी लागी जीवा, लागलीसे आस' शीर्षकाखाली रांगोळी रेखाटली आहे. २ बाय ३ फूट आकाराची लेक कलर मधील रांगोळी काढण्यासाठी त्यांना ११ तास इतका वेळ लागला. ही कलाकृती ज्योती फोटो स्टुडिओ नाझर कॅम्प, येळ्ळूर रोड, माधवपूर, वडगाव- बेळगाव येथे दिनांक १५ जुलै २०२२ पर्यंत सकाळी ९ ते सायंकाळी ८ पर्यंत सर्वांना पाहण्यासाठी खुली ठेवण्यात आली आहे.
अजित औरवाडकर यांनी यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, तानाजी मालुसरे, राजर्षी शाहू महाराज, बाळासाहेब ठाकरे, स्वातंत्र्यवीर सावरकर, भारतरत्न लता मंगेशकर, भीमसेन जोशी, स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सनई वादक बिस्मिल्ला खान, सिंधुताई सपकाळ, सचिन तेंडुलकर, नरेंद्र मोदी, अण्णा हजारे, बिपिन रावत आदी शेकडो रांगोळ्या टाकून रांगोळी प्रेमींची वाहवा मिळवली आहे. आषाढी एकादशी निमित्त टाकलेली श्री विठ्ठलाची रांगोळी औरवाडकर यांच्या लौकिकात भर टाकणारी तर आहेत पण रांगोळी कलेला सर्वोच्च शिखरावर नेणारी ठरेल.
No comments:
Post a Comment