सापाचे संग्रहित छायाचित्र |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथे दरवर्षी नागपंचमीला होणारे सर्पप्रदर्शन व सापाबद्दलची शास्त्रोक्त माहिती देणारा उत्सव सन २०१९ चा महापूर व त्यानंतर दोन वर्षे कोरोना महामारी असा तीन वर्षे खंडित झाला होता. तो सालाबादप्रमाणे यावर्षी पुन्हा सुरू करणे बाबत व्यापक बैठकीचे आयोजन ढोलगरवाडी येथील मामासाहेब लाड विद्यालयात १४ जुलै रोजी दुपारी २ वाजता बोलावण्यात आल्याची माहिती सर्पोद्यानचे कार्यकारी संचालक व शेतकरी शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष तानाजी वाघमारे यांनी दिली आहे.
१९६६ पासून आद्य सर्पमित्र कै बाबूराव टक्केकर यांनी साप हा आपला शत्रू नसून तो मित्र आहे, पर्यावरण संतुलन साखळीतील तो सर्वोच्च महत्त्वाचा घटक आहे. हे शास्त्रोक्त पद्धतीने जनमानसावर बिंबवण्याचे समाजकार्य सुरू केले. ते गेली ५५ वर्षे अखंडितपणे सुरू आहे. सर्पमित्र टक्केकर यांचे शिष्य त्यांचा वारसा आज पुढे चालवत आहेत. तथापि सेंट्रल झु ऑथॉरिटी ऑफ इंडिया नवी दिल्ली यांनी हे सर्पोद्यान रद्द करण्याची नोटीस २०१६ ला प्रथम बजावली. त्यानंतर महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यातील आमदार, खासदार, मंत्री, शासकीय अधिकारी, सर्प प्रेमी व ग्रामस्थांच्या सहकार्याने न्यायालयीन लढाईत सर्पोद्यानला मुदतवाढ मिळाली आहे. राज्य व केंद्र शासनाच्या सहकार्यातून यापुढेही सर्पोद्यान सेंट्रल झु ऑथॉरिटी ऑफ नवी दिल्ली व इतर संलग्न विभागांच्या अटी लवकरच पूर्ण करील अशी खात्री तानाजी वाघमारे यांनी व्यक्त केली आहे.
३ ऑगस्ट २०२२ रोजी येणाऱ्या नागपंचमी सणानिमित्त निसर्ग, पर्यावरण संगोपन व वृद्धि, वनसंरक्षण तसेच सर्प विषयक शास्त्रीय ज्ञान देऊन अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम सर्वांच्या सहकार्याने व संमतीने यशस्वी करूया! असे आवाहन करत तानाजी टक्केकर यांनी बैठकीस वन विभागासह अन्य प्रशासकीय अधिकारी व पत्रकारांना निमंत्रित केले सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.
No comments:
Post a Comment