आशियाई ज्युनियर कुस्ती स्पर्धेत भारतीय मुलींचा संघ द्वितीय, चंदगडचे सुपुत्र राम पवार मुख्य प्रशिक्षक - चंदगड लाईव्ह न्युज

09 July 2022

आशियाई ज्युनियर कुस्ती स्पर्धेत भारतीय मुलींचा संघ द्वितीय, चंदगडचे सुपुत्र राम पवार मुख्य प्रशिक्षक

 *बेहरीन*  :  कुस्तीपटूसमवेत मुख्य प्रशिक्षक राम पवार, सहायक प्रशिक्षक राम रतन, मनीषा संबल.

 *कागणी : एस. एल. तारिहाळकर / सी. एल. वृत्तसेवा*

      बेहरीन (अरब कंट्री) येथे झालेल्या  मुलींच्या 20 वयोगटाअंतर्गत आशियाई ज्युनियर कुस्ती   स्पर्धेमध्ये भारतीय संघाने द्वितीय क्रमांक मिळवला. केवळ दोन पॉईंटस कमी मिळाल्याने भारताचा प्रथम क्रमांक हुकला. यामध्ये जपान संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. या संघाला मुख्य प्रशिक्षक म्हणून मांडेदुर्ग (ता. चंदगड) या गावचे सुपुत्र व सध्या पटियाळा (पंजाब)  येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स ऑथरिटीकडे कार्यरत असणारे वरिष्ठ प्रशिक्षक राम पवार (बेळगाव) यांच्यासह सहाय्यक प्रशिक्षक राम रतन (राजस्थान), मनीषा संबल (ओडिशा) यांचे त्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.

राम पवार

           राम पवार बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री सेंटरचे सुभेदार कार्यरत आहेत. मात्र त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन त्यांची तीन वर्षासाठी पटियाळा येथे प्रशिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी निवड झाली आहे. गत दहा दिवसापासून ते स्पर्धेसाठी बेहेरीन येथे आहेत. रविवार दि. 10 रोजी संघाचे भारतात आगमन होईल. शुक्रवार दि. 8 रोजी या स्पर्धेची सांगता झाली. या स्पर्धेत जपान संघाने प्रथम, भारतीय संघाने द्वितीय तर कुजबेकिस्तान संघाने तृतीय क्रमांक पटकाविला. याशिवाय या स्पर्धेमध्ये मंगोलिया, बेहेरीन, तायपाई, कोरिया अशा आठ देशांचे संघ सहभागी झाले होते. भारतीय संघामधून विविध 10 वजनी गटात दहा कुस्तीपटू सहभागी झाल्या होत्या. या दहा जणींनी सर्वच गटात पदक मिळवण्यात यंदा विक्रम केला. 

             भारतीय संघातील सर्व कुस्तीपटू या हरियाणा राज्यामधील आहेत. यात  अर्जू (६८ किलो, सुवर्ण),  प्रियांका (६५ किलो, सुवर्ण), अँटिम (५३ किलो, सुवर्ण), स्वीटी (50 किलो, रौप्य), बिपासा (७२ किलो, रौप्य ), प्रिया (७६ किलो, रौप्य ), रीना (५५ किलो, रौप्य), सिटो (५७ किलो, कांस्य), सारिका (६२ किलो, कास्य ), तनु मलिक (५९ किलो, कास्य) यांनी यश संपादन केले. भारतीय संघाने प्रथमच आशियाई चॅम्पियनशिपमध्ये दहा वजनी गटामध्ये प्रत्येकी विभागात एक पदक प्राप्त केले आहे. या स्पर्धेमध्ये भारतीय संघाने 3 सुवर्ण पदके, 4 रौप्य पदक, तर 3 कास्य पदके  प्राप्त केले आहेत. या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या जपान या देशाच्या संघाला 202 गुण प्राप्त झाले, तर भारतीय संघाला 200 गुण प्राप्त झाले. केवळ दोन पॉईंटसमध्ये भारतीय संघाचे विजेतेपद हुकले. 

                 नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स ॲथोरिटी कडे वरिष्ठ प्रशिक्षक म्हणून निवड होणारे ते चंदगड तालुक्यातील पहिले कुस्ती तज्ञ आहेत. या यशाबद्दल मराठा लाईट इन्फंट्री सेंटरमध्ये तसेच त्यांच्या मांडेदुर्ग (ता. चंदगड) या मूळ गावीही त्यांचे अभिनंदन होत आहे. सैन्य दलाच्या अखत्यारित येणाऱ्या कुस्ती क्षेत्रामध्ये विशेष उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल व आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उंचावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः राम पवार यांचा दिल्ली येथे सत्कार केला आहे. तर बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री सेंटरचा जवान व महाराष्ट्र केसरी पुरस्कार विजेता पृथ्वीराज पाटील याचे बेळगाव सेंटर मध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणून राम पवार यांचे मार्गदर्शन मोलाचे लाभले. राम पवार यांच्या कर्तबघारीमुळे चंदगडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. 
  

No comments:

Post a Comment