चंदगडच्या आगार प्रमुखांना निवेदन देताना पालक. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
कोवाड (ता. चंदगड) येथील श्रीमान व्ही पी. देसाई उच्च माध्यमिक विद्यालय व कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचे अनियमित बससेवेमुळे हेळसांड होत आहे. त्यामुळे कोवाड परिसरातील विद्यार्थ्यांची गैरसोय दुर करण्यासाठी एस. टी. सेवा सुरळीत सुरु करा अन्यथा ८ ऑगस्ट २०२२ रोजी कोवाड येथे आंदोलन करणार असल्याचा इशारा पालक व विद्यार्थ्यांनी चंदगडच्या आगार प्रमुखांकडे निवेदनातून दिला आहे.
किणी कर्यात भागातील जवळपास 20 खेड्यातील व कर्नाटक सीमा भागातील बेकिनकेरे, दड्डी, अतिवाड, बसुर्ते व उचगांव भागातील अनेक विदयार्थी शिक्षणासाठी कोवाडला जातात. यामध्ये मुलींची संख्या जास्त आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या या विद्याथ्र्यांना एस. टी. बसची गरज आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे बस सेवा खंडीत झाल्याने बाहेरगावच्या विद्यार्थांची मोठी हेळसांड झाली आहे. पण चालू शैक्षणिक वर्षापासून कोरोनाचे नियम पाळून शाळा, कॉलेज नियमित सुरु आहेत. पण दड्डी कामेवाडी, राजगोळी, बेळगांव, नागरदळे, माणगांव व नेसरी या मुख्य मार्गावरुन तसेच दिंडलकोप, किटवाड, मलतवाडी या जोड मार्गावरुनही बस सेवा नियमीत सुरु झाल्या नाहीत. कॉलेज सुरु होऊन दोन महिन्याचा कालावधी झाला तरी अद्याप आपणाकडून बस सुरु करण्याबाबत दखल घेतली जात नाही.
विद्यार्थ्यांनी एस. टी. पास काढले आहेत. तसेच आहिल्याबाई होळकर मोफत पास योजनेंतर्गत मुलीना आपल्याकडून मोफत पास दिले आहेत. पण बस नसल्याने विद्याथ्र्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे बस अभावी विद्यार्थ्यांना शाळेला पाठविणे अडचणीचे झाले आहे. यातून आमच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे आगार व्यवस्थापकांनी वेळापत्रकानुसार बस सेवा सुरु करुन विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करावी, अन्यथा ८ ऑगस्ट २०२२ रोजी कोवाड येथे आंदोलन करु असा इशारा आगार प्रमुखांना दिला आहे. याबाबतचे निवेदन चंदगडचे तहसिलदार विनोद रणवरे व पोलिस निरिक्षक संतोष घोळवे यांनाही दिले आहे. निवेदनावर ॲड. संतोष मळविकर, डॉ. ए. एस. जांभळे, जनार्दन देसाई, नरसिंग बाचुळकर, रावसाहेब खराडे, गोपाळ कांबळे, मोहन पाटील यांच्यासह पंधराहून अधिक पालकांच्या सह्या आहेत.
No comments:
Post a Comment