चंदगड : जप्त केलेल्या दुचाकीसह संशयीत चोरटा, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे व अन्य कर्मचारी.
एस. एल. तारिहाळकर / कागणी : सी. एल. वृत्तसेवा
चंदगडमध्ये काही तरुणांनी व नागरिकांनी एक लाखाच्या दुचाकी चोरट्यांच्या टोळीकडून बेकायदेशीरपणे १० हजार ते १५ हजार रुपयात खरेदी केल्या आहेत. अशा बिनाकागदपत्राच्या दुचाकी खरेदी करणाऱ्या मालकांचे धाबे आता दणाणले आहेत. चंदगड पोलिसांनी अशा प्रकरणात सापडलेल्या सात दुचाकी जप्त केल्या असून या प्रकरणात सक्रिय असणाऱ्या एका तरुणांच्या टोळीच्या मागावर चंदगड पोलीस आहेत. प्राथमिक टप्प्यात आंबेवाडी (ता. चंदगड) येथील संकेत अर्जुन कोल्हाळ (वय 20, रा. आंबेवाडी, ता. चंदगड) या तरुणाला अटक करण्यात आली असून त्याला चंदगड न्यायालयाने सोमवार पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर या टोळीत सहभागी असणाऱ्या कोनेवाडी व पाटणे (ता. चंदगड) येथील काही तरुणांकडे अधिक चौकशी सुरू आहे. दुचाकी चोरीच्या तपासाबाबत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील व आनंद देसाई यांना प्रत्येकी दुचाकीमागे एक हजार रुपयांचे बक्षीस देऊन पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी गौरव केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चंदगड तालुक्यात केवळ दहा हजारात दुचाकी मिळू लागल्याची खबर पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील व आनंद देसाई यांना मिळाली. सदर गाड्या जुन्या पण काही महिन्यापूर्वीच्या आहेत. याबाबत अधिक माहिती घेतली असता आंबेवाडी गावाशेजारी जंगलाला लागून असणाऱ्या संकेत यांच्या पोल्ट्रीमध्ये एक दुचाकी सापडली. यानंतर कसून तपास करता त्याच्याकडून चोरी करून 10 हजारात विकलेल्या 7 दुचाकी जप्त करण्यात आल्या. सदर दुचाकी बेळगाव-वडगाव, येळेबैल (ता. बेळगाव) व चंदगड तालुक्यातील सरोळी, हाजगोळी, सुरूते, तूर्केवाडी येथील प्रत्येकी 1 अशा 7 दुचाकी काही महिन्यापूर्वी चोरीला गेल्या आहेत. संकेत व त्याच्या टोळीने या दुचाकी केवळ 10 हजार रुपयाला माडवळे येथे 1, आंबेवाडी येथे 2, बेळेभाट येथे 2, जंगमहट्टी येथे 1, पार्ले येथे 1 अशा 7 दुचाकी 7 ग्रामस्थांना विकल्या आहेत.
याबाबत अधिक तपास सुरू आहे. चोरट्यांच्या टोळीमध्ये कोनेवाडीचा एक तरुण सहभागी आहे. सदर तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर चोरीच्या दुचाकींची अधिक माहिती मिळेल, अशी शक्यता आहे. चंदगड तालुक्यात चंदगड व बेळगाव तालुक्याच्या सीमेवरील काही गावातून भर दिवसा दुचाकींची चोरी होत आहे. रस्त्यावर लावलेली आणि शेतात जाऊन दहा मिनिटात येईपर्यंत अनेक दुचाकी चोरीला गेल्या आहेत. या पाठीमागे बेळगाव येथील चोरांची टोळी सक्रिय असल्याची चर्चा होती, मात्र या दरम्यानच आता आंबेवाडीतील तरुणाला अटक केल्यानंतर या अधिक माहिती उघड होईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
अनेक ठिकाणी दुचाकी चोरायच्या आणि आपापल्या गावाजवळ ओळखीच्या लोकांना 10 ते 15 हजारात सदर गाड्या विकायच्या, असा असा प्रकार या चोरट्याकडून सुरू होता. या गाड्या खरेदी करणाऱ्यांनाही चंदगड पोलिसांनी नोटीस दिली आहे. शिवाय अशा अनेक दुचाकी विविध गावात वापरात आहेत. या सर्वांनीच पोलिसांकडून सुरू असलेल्या चौकशीचा धसका घेतला आहे.
No comments:
Post a Comment