चंदगड तालुक्यात रोप लावणीची कामे अंतिम टप्प्यात, पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत - चंदगड लाईव्ह न्युज

31 July 2022

चंदगड तालुक्यात रोप लावणीची कामे अंतिम टप्प्यात, पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत

रोपलावण करताना महिला

नंदकुमार ढेरे - चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

               चंदगड तालुक्यात रोप लागवडीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. पावसाचा जोर कमी झाला असला तरी शेती कामांना उपयुक्त ठरत आहे. जूलै महिन्यात  झालेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.  त्यानंतर आद्रा नक्षत्र संपूर्ण कोरडे गेल्याने शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत होते. पुनर्वसु नक्षत्र सुरु झाल्यानंतरही पावसाचा पत्ता नसल्याने बळीराजा चिंतेत होता. 

        रोप लागवड २५ दिवसाच्या आत केल्यास उत्तम असते. मात्र तरवे टाकून महिना उलटला तरी पावसाचा मागमूस नसल्याने रोप लागवडीला विलंब होत होता. पुनर्वसू नक्षत्राच्या अखेरीस पावसाला सुरुवात झाल्याने रोप लागवडीच्या कामाला गती आली. रोप लावण्याआधी चिखल करण्यास बैलांचा वापर कमी झाला आहे. आता गावोगावी पॉवर टिलर आल्याने कामे सोपी झाली आहेत. मात्र रोप लागवडीचे क्षेत्र अधिक आणि पॉवर टिलर मोजकीच असल्याने त्यांचीही प्रतीक्षा करावी लागत आहे. यंदा पॉवर टिलरचा एक तासासाठी पाचशेहे  रुपये दर आहे. रोप लागवडीची कामे एकाच वेळी सुरू असल्याने मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पैरा पद्धत अवलंबली आहे. 

         मजुरीची माणसे न घेता "पावणेर" पध्दतीने एकमेकांचे रोप लावण करण्याची पद्धत दिसत आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना युरियाची अजूनही टंचाई भासत आहे. कृषी सेवा केंद्रात मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने युरियासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. रोप लागवडीनंतर तीन दिवसाच्या आत तणनाशक औषध शिंपडणे कामही केले जात आहे. पावसाअभावी विलंबाने सुरू झालेली रोप लावण आता अंतिम टप्प्यात आली आहे. रताळी लागवडही नुकतीच पूर्णत्वाला आली आहे. तर पावसााअभावी काही प्रमाणात नाचण लागवड खोळंबली आहे.

No comments:

Post a Comment