शालेय विद्यार्थ्यांना तात्काळ गणवेश द्या, अन्यथा आंदोलन..! संभाजी ब्रिगेडचा इशारा - चंदगड लाईव्ह न्युज

27 July 2022

शालेय विद्यार्थ्यांना तात्काळ गणवेश द्या, अन्यथा आंदोलन..! संभाजी ब्रिगेडचा इशारा

गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन देताना संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी.

कोल्हापूर : सी. एल. वृत्तसेवा

           जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सुरू होऊन दोन महिने होत आले तरी शासनाकडून दिला जाणारा शालेय गणवेश विद्यार्थ्यांना दिला गेला नाही. याच्या निषेधार्थ मराठा सेवा संघ प्रणित संभाजी ब्रिगेडने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

          प्राथमिक शाळा सुरू होऊन दोन महिने होत आले. तथापि कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अजून गणवेश मिळालेले नाहीत. हे गणवेश शाळेच्या पहिल्या दिवशी मिळणे अपेक्षित होते. गणवेशामुळे विद्यार्थ्यांचा शिक्षणातील उत्साह वाढतो. शिस्त अंगी बाणते. पण याबाबत कुणालाच गांभीर्य नाही. गणवेशसाठी लागणारी रक्कम संबंधित विभागाच्या खात्यावर अद्यापही जमा नसल्याचे समजते. त्याचबरोबर मिळत असलेले गणवेश फक्त मुली आणि अनुसूचित जातीची मुले यानांच मिळतात. मग बाकीच्या मुलांनी काय घोडे मारले आहे. 

             शाळेतील प्रत्येक मुलाला समान गणवेश असला पाहिजे. दुजाभाव करून बाल मनावर जातीयतेची बीजे पेरली जाण्याचा धोका आहे. तरी सरसकट सर्व मुला-मुलींना प्रत्येकी दोन गणवेश मिळावेत. याबाबत आपण योग्य तो पाठपुरावा व याबाबत गांभीर्याने लक्ष घालून विद्यार्थ्यांना तात्काळ गणवेश वितरण करावे. अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा करवीरचे गटशिक्षणाधिकारी समरजीत पाटील यांना निवेदनाद्वारे दिला आहे. याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे‌ जिल्हा उपाध्यक्ष नेताजी बुवा, जिल्हा कार्याध्यक्ष भगवान कोईगडे, सर्जेराव काळूगडे, राहुल पाटील, दत्तात्रय मेटील, योगेश जगदाळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment