कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
किल्ले पारगड (ता. चंदगड) येथे सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या मावळ्यांनी काल दि. ३१ जुलै २०२२ रोजी दिवसभर स्वच्छता मोहीम राबवली. सोडा, पाणी, कोल्ड्रिंक्स च्या प्लॅस्टिक बाटल्या, काचेच्या दारू, बीअर बाटल्या, सिगारेटची रिकामी पाकिटे, खाऊच्या पदार्थांची प्लॅस्टिक आवरणे असा सुमारे ३० पिशव्या भरून कचरा गोळा केला. स्वच्छता मोहिमेनंतर 'शिवरायांच्या स्वराज्यातील गड किल्ल्यांचे पावित्र्य व स्वच्छता राखण्याची जबाबदारी कोणाची?' असा सवाल प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी उपस्थित केला.
छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गोव्याच्या सीमेवरील व कोल्हापूर जिल्ह्यातील शेवटच्या अजिंक्य किल्ले पारगडची भ्रमंती करण्यास आलेल्या सह्याद्री प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी गडावर ठिकठिकाणी पडलेला कचरा पाहून स्वच्छता व दुर्गसंवर्धन मोहीम घेतली. किल्ल्यावरील तलाव साफाई करताना आत पडलेले शिवकालीन तटबंदीचे चिरे अथक परिश्रमाने बाहेर काढले, त्यांनतर किल्ल्यावरील कचरा गोळा केला. अनेक ठिकाणी पाण्याच्या बाटल्या खाऊची पाकिटे या बरोबरच दारूच्या बाटल्या व सिगारेट चे बॉक्स देखील सापडले. तब्बल तीन तास मेहनत घेऊन दुर्गसेवकांनी सुमारे ३० पिशव्या कचरा गोळा केला.
स्वराज्य रक्षणात ज्या गडकोट किल्ले व धारातीर्थी पडलेल्या मावळ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली त्यांच्या स्मृतींचा ऐतिहासिक ठेवा जतन केला पाहिजे. अशा ठेव्यांची नासधूस, विद्रुपीकरण थांबवणे, कचरा इतस्ततः न टाकता त्याचे पावित्र्य राखणे ही जबाबदारी शासनाची, स्थानिक लोकांची, येणाऱ्या पर्यटकांची की दुर्ग सेवकांची? असा सवाल प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी मोहीम समाप्तीवेळी व्यक्त केला. यावेळी गडावरील शेलारमामांचे वंशज व सामाजिक कार्यकर्ते रघुवीर खंडोजी शेलार, तानाजी व रायबा मालुसरे यांचे वंशज सुनील मालुसरे, प्रकाश चिरमुरे व ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment