ढोलगरवाडी येथील नागपंचमी कार्यक्रम प्रसंगी उपस्थित वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
शेतकरी शिक्षण मंडळ ढोलगरवाडीचे संस्थापक सर्पमित्र कै. बाबुराव टक्केकर यांनी १९६६ पासून समाजातील सापांबद्दलच्या अंधश्रद्धा व गैरसमज दूर करण्यासाठी सापांची वैज्ञानिक व वैद्यकीय दृष्ट्या महत्त्व पटवून देण्यासाठी विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून प्रशिक्षण दिले. साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे त्याचे संवर्धन करणे हे समाजाचे कर्तव्य आहे हे पटवून दिले.
५६ वर्षे नागपंचमीचा उत्सव मामासाहेब लाड विद्यालय च्या प्रांगणात साजरा केला जातो. यावर्षीही महाराष्ट्र शासन वनविभाग व पोलीस खाते यांच्या मार्गदर्शनाखाली ढोलगरवाडी येथे प्रबोधनात्मक नागपंचमी उत्सव साजरा करण्यात आला. संस्थापक सर्पमित्र कै. बाबुराव टक्केकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. बंदी आदेशामुळे दरवर्षीप्रमाणे जीवंत सापाचे प्रदर्शन न करता सापांच्या माहितीचे फलक, चित्रकृती, विविध प्रकारचे मॉडेल्स या माध्यमातून सापांच्या बद्दलची माहिती सर्प प्रेमींना देण्यात आली. शाळेच्या विद्यार्थ्याकडून मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत सर्पप्रेमींना सापांच्या बद्दलची माहिती देण्यात आली. यावेळी संस्थेच्या संचालिका श्रीमती शांता बाबुराव टक्केकर यांचा सेवानिवृत्ती निमित्त तर कडलगे व ढोलगरवाडीचे पोलीस पाटील राजेंद्र पाटील यांना आदर्श पोलीस पाटील पुरस्कार मिळाल्यामुळे सत्कार करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा येथील हजारो पर्यटक सर्प प्रेमींनी नागपंचमी कार्यक्रमाला भेट दिली. यावेळी संपूर्ण दिवसभर पाटणे वन विभागाचे वनक्षेत्रपाल पी. ए. आवळे तसेच चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले. मुख्याध्यापक एन. जी. यळळूरकर, उपाध्यक्ष तानाजी वाघमारे, एन. एन. पाटील, सरपंच सरिता तुपारे, उपसरपंच व्हानापा तुपारे, धानबा कदम, विलास कांबळे, टी. बी. गिलबिले, महादेव भोगुलकर, गुलाब पाटील, गावडू पाटील, नरसू पाटील, मामासाहेब लाड विद्यालय व ज्युनि. कॉलेजचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment