चंदगड तालुक्यात सार्वजनिक गणरांयाचे उत्साहात विसर्जन - चंदगड लाईव्ह न्युज

10 September 2022

चंदगड तालुक्यात सार्वजनिक गणरांयाचे उत्साहात विसर्जन

चंदगड शहरात मिरवणुकीने विसर्जनाला जाणारे सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

           चंदगड शहरासह तालुक्यातील विविध भागात सार्वजनिक गणपती बरोबरच काही घरगुती  बाप्पाना भक्तीभावाने अखेरचा निरोप देण्यात आला. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते विविध प्रकारची वस्त्रे परिधान, पारंपारीक वाद्यांच्या गजरात मिरवणूकीत सहभागी झाले.

     एक गाव एक गणपती ही संकल्पना शासनामार्फत रुजवली जात असतानाही ब-याच ठिकाणी मात्र प्रत्येक मंडळाचा स्वतंत्र गणपती पूजविला जातो.चंदगड येथील चंद्रसेन मंडळाचा गणपती विसर्जन साठी सायंकळी चार वाजता मिरवणुकीने बाहेर काढण्यात आला. संभाजी चौकात नगरपंचायतीच्या वतीने शामियाना उभारण्यात आला होता. या ठिकाणी नगराध्यक्षा प्राची काणेकर, उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला, नगरसेवक दिलीप चंदगडकर, अभिजित, गुरबे, सचिन नेसरीकर, नगरसेविका नेत्रदिपा कांबळे, सौ. दाणी, सौ.चंदगडकर, सौ. कुंभार आदीच्या उपस्थितीमध्ये मंडळाना  मानाचे श्रीफळ देण्यात आले.

              उत्कर्ष , रामदेव , रवळनाथ व नवीन वसाहतीमधील मंडळाचा गणपती बँक आफ इंडियामार्गे बाजारपेठेतून कैलास कॅर्नरमार्गे ताम्रपर्णीच्या वसंत घाटावर नदीमध्ये रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान विसर्जित करण्यात आली. तर शिरगांव, नागनवाडी, कुर्तनवाडी, कोरज, दाटे, डुक्करवाडी, माणगाव, हलकर्णी, धुमडेवाडी, शिवनगे, म्हाळेवाडी, निट्टूर, कोवाड, किणी, राजगोळी, नांदवडे आदीसह ताप्रपर्णी नदीकाठी असलेल्या गावातील मंळानी ताम्रपर्णी नदीत तर कानुर, गवसे, बुझवडे, इब्राहिमपूर, अडकुर, पोवाचीवाडी, कानडी, सावर्डे, सातवणे, वाळकोळी, केरवडे, आमरोळी, बोंजुर्डी आदी गावातील मंडळानी घटप्रभा नदीत गणपती विसर्जन केले.                    विसर्जन मुरणूकीला रात्र झाल्याने बत्ती व जनरेटर लावून कार्यकर्ते  नाचत होते. विसर्जन मिरवणूकीला पावसाने हजेरी लावली तरीही कार्यकर्त्यांचा उत्साह दांडगा होता. मिरवणूकीच्या काळात कोठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस निरिक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. फटाक्यांची आतीषबाजी व गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला चैन पहेना आम्हाला च्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता.

No comments:

Post a Comment