तेऊरवाडी येथे दुर्गा माता दौडला मोठा प्रतिसाद - चंदगड लाईव्ह न्युज

29 September 2022

तेऊरवाडी येथे दुर्गा माता दौडला मोठा प्रतिसाद

तेऊरवाडी येथील दुर्गामाता दौडमध्ये सहभागी झालेले युवक

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

          तेऊरवाडी (ता. चंदगड) येथे दुर्गामाता दौडला मोठा प्रतिसाद मिळत आहे. गावातील सर्व युवक -युवती या दौडमध्ये सहभागी होत असल्याने सवत्र आनंदाचे  व वातावरण निर्माण झाले आहे.

           भल्या सकाळी साडे - पाच वाजता सर्व मावळे तेऊरवाडीतील  छत्रपती संभाजी  महाराज चौकात असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्ती जवळ जमा होतात. यावेळी सर्वांच्या डोक्यात पांढरी टोपी  व अंगात पांढरा सदरा असतो. बसवाणमाळापासून ते नविन वसाहतीबरोबर संपूर्ण गावभर हे मावळे अनवाणी फेरी मारतात. छत्रपती शिवाजी महारांजांच्या मुर्तीला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करुन दुर्गा दौड फेरीस सुरुवात होते. फेरीच्या अग्रभागी हिंदुराष्ट्र भगवा ध्वज असतो. त्यांनतर त्या पाठोपाठ दोन रांगेत सर्व मावळे शिस्तीचे काटेकोरपणे पालन करत मार्गक्रमण करतात. दुर्गा दौड फेरी दरम्यान जागो हिंदु जागो अशी वेगवेगळी पद्य गाणी, घोषणा देत दौडला सुरवात होते. एक मावळा पुढे म्हणतो त्या पाठोपाठ सर्व मावळे गातात. ग्रामस्थ विशेषकरुन महीला वर्ग मोठ्या आनंदाने या फेरीच्या स्वागतासाठी सज्ज असतात. 

             घरासमोर सडा रांगोळी काढली जात आहे. फेरी घरासमोर आल्यावर महिला भक्तीभावाने भगव्या ध्वजाची पुजा करतात. या फेरीत दिडशे ते दोनशे मावळे सहभागी होतात. नऊ दिवस दररोज या दुर्गामाता दौडची व भगव्या ध्वजाची पुजा करतात. रोज या दुर्गा दौड फेरीचा समारोप दुर्गा  मातेच्या मुर्ती समोर होतो. तेथे आरती होते त्यानंतर सर्वांना प्रसाद वाटप होतो व पुन्हा दुसऱ्या दिवशीच्या फेरीचे नियोजन केले जाते. या फेरीत चार- पाच वर्षापासुन ते तीस - पस्तीस वयोगटातील मुलांचा सहभाग असतो. विजया दशमीच्या दिवशी या फेरीत महीला व तरुणींचाही सहभाग असतो. सर्वांच्या डोक्यावर भगवा फेटा किव्हा गांधी टोपी परिधान केलेली असते. त्यामुळे या फेरीचे आकर्षण आणखीनच वाढते. या फेरीमुळे गावातील वातावरण भक्तीमय झालेले आहे. गेल्या ३० वर्षापासून ही दौड अखंडपणे चालू आहे.

No comments:

Post a Comment