![]() |
मागण्यांचे निवेदन देताना कामगार. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
म्हाळुंगे (ता. चंदगड) येथील ईको केन साखर कारखान्याने २०२२-२३ चा गळीत हंगाम तोंडावर आला असताना २०२१-२२ या हंगामातील शिल्लक असलेली तोडणी व वाहतूक बिले अद्याप मिळालेली नाहीत. वारंवार मागणी करूनही कारखाना प्रशासन बिले द्यायला टाळाटाळ करत असल्याने तोडणी, वाहतूकदारांनी आक्रमक होत आज कारखान्यावर धडक मोर्चा काढला. यावेळी संतप्त आंदोलनकर्त्यांनी बिले मिळेपर्यंत कारखाना सुरू करू देणार नाही अशी भूमिका घेत टाळे ठोकण्याचा इशारा दिला.
अखेर तुडये सरपंच विलास सुतार आणि सामाजिक कार्यकर्ते पांडूरंग चव्हाण यांच्या मध्यास्थीने दोन दिवसात बिलाचे धनादेश देण्याच्या आश्वासननंतर हे आंदोलन तात्पुरते मागे घेतले. तसेच जर दोन दिवसात पैसे मिळाले नाहीत तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. या प्रकरणात कारखाना प्रशासनाच्या वतीने व्यवस्थापक धीरज दोड्डन्नावर यांनी मागील महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व बिले देण्याचे आश्वासन दिले होते. त्यातही काही वाहतूकदारांना निम्याच बिलाचे पैसे दिले गेले.
या सर्व प्रकरणानंतर अद्याप तोडणी, वाहतूकदारांना पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे आज तुडये, सरोळी, हाजगोळी, ढेकोळी, मळवी, म्हाळुंगे परिसरातील तोडणी, वाहतूकदारांनी कारखान्यावर मोर्चा काढला. अखेर आता दोन दिवसात उर्वरित सर्व बिले अदा करण्याचे आश्वासन व्यवस्थापक दोड्डान्नवर यांनी दिले आहे. यावेळी शंकर तुकाराम बसरीकट्टी, रोहित भरमाण्णा पाटील, मधुकर निवगिरे, चाळोबा पाटील, आप्पाजी पाटील, प्रकाश मेलगे, जोतिबा विठ्ठल पाटील, रमेश भैरू बोद्रे, गंगाराम लक्ष्मण पाटील, रामलिंग मारुती पाटील, चाळोबा सखोबा दळवी आदीसह तोडणी, वाहतूकदार उपस्थित होते.
No comments:
Post a Comment