दौलत कामगारांचे गुरुवारी अथर्व प्रशासन विरोधी बोंबमारो आंदोलन - चंदगड लाईव्ह न्युज

14 September 2022

दौलत कामगारांचे गुरुवारी अथर्व प्रशासन विरोधी बोंबमारो आंदोलनचंदगड / प्रतिनिधी

        हलकर्णी (ता. चंदगड) येथील अथर्व-दौलत च्या कामागारांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या  बेमुदत संपाचा आज २७वा दिवस आहे. येथील गणेश मंदिरात झालेल्या कामगार सभेत युनियन बरोबर अथर्व व्यवस्थापन चर्चा करत नसल्याबद्दल गुरुवार दि. १५ सप्टेंबर रोजी हलकर्णी फाटा ता.चंदगड येथे बोंबमारो आंदोलन करणार आहेत.यानंतरही रविवार पर्यंत कामगारांच्या मागण्याबाबत अथर्व व्यवस्थापनाने युनियन बरोबर चर्चा करुन करार केला नाही, तर सोमवार दि.१९/०९/२०२२ रोजी अथर्व इंटरट्रेड प्रा.लि. च्या कोल्हापुर येथील कार्यालयासमोर कामगारांच्या महिला कुटुंबियांची निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कामगारांच्या सभेत युनियनचे अध्यक्ष प्रा.सुभाष जाधव यांनी अथर्व व्यवस्थापन युनियन बरोबर चर्चा करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप केला.त्यांच्या या मानसिकतेमुळेच संप लांबत चालला असल्याचे प्रा.जाधव यांनी सांगितले. त्यामुळे युनियनला आपले आंदोलन अधिक तीव्र करावे लागत आहे. प्रा.आबासाहेब चौगुले यांनी आपला संप लढा अंतिम टप्यात आलेला असुन करार होइपर्यंत कामगारांनी एकजुट कायम ठेवण्याचे आवाहन केले.

यावेळी प्रदीप पवार, संजय देसाई, अशोक चांदेकर, महादेव फाटक, अशोक गावडे, विष्णु कांबळे, नारायण तेजम, मारुती मळवीकर, नामदेव शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. अनिल होडगे यांनी आभार मानले.
No comments:

Post a Comment