शेतकऱ्यांना कुसुम सोलार पंप मिळावेत, भारतीय किसान संघाची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

30 September 2022

शेतकऱ्यांना कुसुम सोलार पंप मिळावेत, भारतीय किसान संघाची मागणी

मागण्यांचे निवेदन नायब तहसिलदारांना देताना भारतीय किसान संघाचे पदाधिकरी

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          शासनाच्या कुसुम सोलार योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी असणारा मंजूर कोटा हा कमी प्रमाणात असुन त्यामुळे सर्वच शेतकऱ्यांना या योजनेतून लाभ मिळत नाही,परिणामी बरेच शेतकरी वंचित आहेत त्यामुळे या योजनेतून प्रत्येक शेतकऱ्याला मिळावा, यासाठी कोटा वाढवून घ्यावा. चंदगड शहरातील  ताम्रपर्णी नदीत सोडण्यात येणारे सांडपाणी थांबवावे, हत्तीने नुकसान केलेल्या पिकांची भरपाई मिळावी आदी मागण्या चंदगड तालुका भारतीय किसान संघामार्फत करण्यात आली आहे, याबाबतचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे.

       कुसुम सोलार योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सोलार पंप दिला जातो. परंतु त्याचा जिल्ह्यासाठी कोटा कमी असल्याने प्रत्येक शेतकऱ्याला पंप मिळतोच असे नाही,त्यामुळे जिल्ह्याचा कोटा वाढवून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत सोलार पंप मिळावा अशी मागणी करण्यात आली. जास्तीत जास्त सोलार पंप शेतकर्यांनी वापरले तर कृषी क्षेत्राला मिळणाऱ्या विजेची बचत होऊन तीच वीज अन्यत्र वापरणे सोपे जाईल. चंदगड शहराला सांडपाण्याचा विळखा पडला आहे. गावाच्या कोणत्याही बाजूला गेल्यावर आपल्याला मोठे गटार आणि सांडपाणी असे चित्र दिसून येते. हे सांडपाणी नदीला वेगवेगळ्या ओढ्यातून सोडले जाते आणि त्यामुळे नदीचे पाणी दूषित झाले आहे. नदीत पाणी सोडलेले असल्याने त्याची दुर्गंधी किमान 3 किमी पर्यंत पसरलेली आहे.          

          तसेच हे पाणी नदी क्षेत्रातील शेतकरी जेव्हा शेतासाठी वापरतो तेव्हा त्यामुळे त्या शेतकऱ्याला रोग राईचा सामना करावा लागतो. या सर्वावर उपाय लवकर व्हावा आणि चंदगड गावाच्या सांडपाण्याचा प्रश्न लवकर सोडवावा,तसेच हत्तीने नुकसान केलेल्या पिकांचे पंचनामे करून योग्य प्रमाणात नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. भारतीय किसान संघाचे जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ शिंदे, मनोज नाडगौडा, अनिकेत मांद्रेकर, प्रल्हाद पाटील, दिलीप गावडे, प्रवीण नेसरीकर, गुरुदत्त फडणीस, सुभाष आजरेकर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment