कालकुंद्री- बेळगाव बस वेळापत्रक प्रश्नी रास्तारोकोचा इशारा - चंदगड लाईव्ह न्युज

22 September 2022

कालकुंद्री- बेळगाव बस वेळापत्रक प्रश्नी रास्तारोकोचा इशारा

कोरोना काळानंतर कालकुंद्री बेळगाव बस पुन्हा सुरू झाली तेव्हा एसटी चालक वाहकांना फेटे बांधून ग्रामस्थांनी जल्लोषी स्वागत केले होते. (तेव्हाचे संग्रहित छायाचित्र)

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
 चंदगड- कालकुंद्री- बेळगाव या कालकुंद्री मुक्कामी बसचे बदललेले वेळापत्रक पूर्ववत न केल्यास कागणी फाटा येथे कालकुंद्री व परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
  कालकुंद्री, कुदनूर, तळगुळी, दिंडलकोप (ता. चंदगड) तसेच कर्नाटक मधील हंदिगणूर, कुरिहाळ, बोडकेनहट्टी, अगसगे ते कंग्राळी मार्गावरील ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन तत्कालीन आगार प्रमुख सुनील जाधव यांनी १६ वर्षांपूर्वी ही बस सुरू केली आहे. दुपारी १२.३० वाजता चंदगड आगारातून सुटणारी बस ढोलगरवाडी मार्गे येऊन २.०० वाजता कालकुंद्री ते बेळगाव निघते, ३.१५ वाजता बेळगाव- कालकुंद्री, ५.०० वा. कालकुंद्री ते बेळगाव व बेळगाव हून सायंकाळी ६.१५ वाजता निघून कालकुंद्री मुक्कामी येते. सकाळी ६.३० वाजता बेळगाव फेरी नंतर कालकुंद्री येथून ९.०० वाजता बेळगाव व बेळगावहून १०.१५ वाजता त्याच मार्गावरून कालकुंद्री, ढोलगरवाडी मार्गे चंदगडला परत जात होती. आगाराला सर्वात जास्त उत्पन्न देणारी बस म्हणून या फेरीकडे पाहिले जात होते. तथापि अलीकडच्या काळातील या बसचा अनियमितपणा, परिणामी प्रवासी वर्गात वाढलेला बस बद्दलचा बेभरवसा, त्यातच आगार प्रमुखांनी मोडतोड करून गेल्या दोन महिन्यात अनाकलनीय पद्धतीने बदललेले वेळापत्रक यामुळे या सर्व बाबींमुळे या बस फेरीचे उत्पन्न कमालीचे घटले असून पूर्वी दहा हजार रुपये रोज होणारे उत्पन्न सध्या दोन तीन हजारावर आल्याचे समजते. हे असेच चालत राहिले तर येत्या काही दिवसात उत्पन्न नसल्याचे कारण दाखवत हा रुट बंद करण्याचा घाट एसटी व्यवस्थापनाचा असल्याचा आरोप कालकुंद्री ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांनी केला आहे. एसटी वेळापत्रक पूर्ववत करण्याबाबतचे निवेदन आगारप्रमुखांना देण्यात आले असून अद्याप कार्यवाही झालेली नाही. वरील जुन्या वेळापत्रकाप्रमाणे येत्या चार दिवसात गाडी न धावल्यास घटस्थापनेनंतर केव्हाही कालकुंद्री व परिसरातील ग्रामस्थ तसेच प्रवाशांच्या वतीने गडहिंग्लज- बेळगाव मुख्य मार्गावर कालकुंद्री फाटा कागणी येथे रास्तारोको आंदोलन करण्यात येईल. असा इशारा उपसरपंच संभाजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य विलास शेटजी, प्रशांत मुतकेकर, अझरुद्दीन शेख, अशोक पाटील आदींसह ग्रामस्थांनी दिला आहे.No comments:

Post a Comment