![]() |
करेकुंडी : मंडळाची श्रीमूर्ती दान करताना मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी. |
कागणी : सी. एल. वृत्तसेवा
करेकुंडी (ता. चंदगड) येथील छत्रपती शिवाजी महाराज युवक मंडळातर्फे यंदा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करून श्रीमूर्ती दान उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाचे चंदगड तालुक्यात कौतुक होत आहे.
याबाबतची माहिती मंडळाचे अध्यक्ष तानाजी तुकाराम पाटील यांनी दिली. गत चार वर्षापासून या मंडळातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. गणेशोत्सव साजरा करण्याचे यंदाचे पाचवे वर्ष असून यंदा पहिल्यांदाच मूर्ती दान उपक्रम राबवून पर्यावरण स्नेही गणेशोत्सवाला मदत केली. गावचे सुपुत्र व शिनोळी येथील फेअर फिल्ड अटलास कंपनीचे कर्मचारी तानाजी तुकाराम पाटील यांनी यंदा सात फूट उंची श्रीमूर्ती देणगी स्वरूपात मंडळाला दिली होती.
मंडळाचे अध्यक्ष तानाजी तुकाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमही उस्ताहात पार पडले आहेत. हळदी - कुंकू कार्यक्रम, झिम्मा फुगडी कार्यक्रम, संगीत खुर्ची तसेच अन्य धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पाडले. महाराष्ट्र शासनाने पर्यावरण पूरक गणेशोस्तव साजरा करण्याचे आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत मंडळाच्या बैठकीत श्रीमूर्ती दान करण्याचा निर्णय घेण्यात आला. सदर मूर्ती नेसरीहून आणण्यात आली होती. गावातील मूर्तिकार पांडुरंग सुतार यांच्याकडे सदर मूर्ती दान करण्यात आली. मंडळाच्या या उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून अन्य मंडळांनीही दान उपक्रम राबवून पर्यावरण रक्षणाला हातभार लावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment