सात्विक व सकस वाचन समृद्ध जीवनाचा मूलाधार - डॉ. पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

16 October 2022

सात्विक व सकस वाचन समृद्ध जीवनाचा मूलाधार - डॉ. पाटील


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          ग्रंथ हेच गुरु मानून विधार्थी जीवनातच सकस व सात्विक ग्रंथांचे विपुल वाचन केल्यास आपले जीवन नक्कीच सुखी व समृद्ध बनते. वाचन संस्कृतिची आवड कॉलेज जीवनातच जोपासा, अब्दुल कलामांसारखी अनेक प्रेरणादायी चरित्रे वाचा व विज्ञानवादी दृष्टिकोण जोपासत मोठी झेप घ्यायाला शिका असे मत प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांनी व्यक्त केले. ते र. भा. माडखोलकर महाविद्यालय यांच्या चंदगड राष्ट्रीय सेवा योजना विभाग व ग्रंथालय विभागाच्या वतीने १५ ऑक्टोबर २०२२ या डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनी ग्रंथप्रदर्शन उदघाटन समारंभ प्रसंगी बोलत होते.  

      महाविद्यालयामध्ये वाचन प्रेरणा दिनानिमित्त भव्य ग्रंथप्रदर्शन भरविण्यात आले आहे. प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील अनेक नवनवीन ग्रंथ, मासिके, शब्दकोश, विश्वकोश, चरित्र ग्रंथ, काव्यसंग्रह, विज्ञानकोश, ई - बुक इ .ची ओळख करून घेतली. याद्वारे त्याना वाचन कौशल्य प्रेरणा मिळाली. 

      ग्रंथपाल प्रा. आर. एस. गडकरी यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला सर्व स्टाफ,  एन. एस. एस. स्वयंसेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. एन. के. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रकल्प अधिकारी प्रा. संजय पाटील यानी आभार मानले. प्रदर्शन आठवडाभर खुले राहणार आहे.

No comments:

Post a Comment