इसापूर आरोग्य उपकेंद्रात कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याची ग्रामस्थांची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

28 November 2022

इसापूर आरोग्य उपकेंद्रात कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याची ग्रामस्थांची मागणी

आरोग्य उपकेंद्र

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      हेरे (ता. चंदगड) आरोग्य केंद्रांच्या अंतर्गत समाविष्ट असलेल्या तालुक्यातील अतिदुर्गम भागातील वसलेल्या इसापूर येथील आरोग्य उपकेंद्रात आरोग्य कर्मचारी नसल्याने नागरिकांना आरोग्य सेवेपासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे शासनाकडून  या उपकेंद्रात कर्मचारी नेमणूक करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत अशी मागणी येथील ग्रामस्थानी केली आहे.

       १५ वर्षीपूर्वी बांधण्यात आलेल्या इसापूर येथील उपकेंद्रात मिरवेल, पारगड, नामखोल, ईसापूर, वाघोत्रे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुंबयाळ धनगरवाडी, रामघाट धनगरवाडी, पेंढरेवाडी, तेरवण, मेढे या गावातील नागरिक उपचार घेतात. या भागात सर्पदंशाच्या घटना वारंवार घडत असतात. इतर आजारही कायम उद्भवत आहेत. अशावेळी १०८, १०२ गाड्यांना फोन करवा म्हटला तर येथे मोबाईलला कव्हरेज नाही. तातडीच्या वेळी रुग्णवाहिका मिळत नाही. मिळाली तर ती वेळेत पोहचत नाही. त्यामुळे रुणांना जीव गमवावा लागतो. दुर्गम भागातील जनतेला कोल्हापूर प्रशासनाकडे संघर्ष करावा लागतो. नेतेमंडळी मात्र या भागाकडे  राजकारणासाठी  पाहत असतात. विकासाच्या नावाने शंख आहे. 

             प्रशासनाकडे आणि जनतेकडे त्यांचे नेहमीच दुर्लक्ष आहे. १४ ऑगस्ट २०२२ पासून येथील नागरिक मोफत उपचारासाठी हॉस्पिटलच्या खर्चाने ओरसला जात आहेत. उपचारासाठी २० कि . मी . हेरे किंवा ३२ कि . मी . चंदगडला जावे लागते. त्याकरीता इसापूरला तत्काळ डॉक्टर, नर्सचा स्टॉफ उपलब्ध करून उपकेंद्र चालू करावे. अन्यथा येथील गावे किल्ले पारगडसह सिंधुदुर्गनगरीला जोडावीत. येथील नागरिकांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने प्रत्येकवेळी खासगी दवाखान्याला जावे म्हटले तर आर्थिक खर्च परवडत नाही. उत्पन्नाचे कोणतेही साधन येथे उपलब्ध नाही. त्यामुळे येथील नागरिकांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने तातडीने आरोग्य सुविधा सूरू करावी, अशी मागणी प्रकाश चिरमुरे, रघुवीर शेलार यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment