चंदगडच्या पर्यटन विकासासाठी राज ठाकरेंंना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

30 November 2022

चंदगडच्या पर्यटन विकासासाठी राज ठाकरेंंना निवेदन

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना निवेदन देताना मनसेचे उपजिल्हाध्यक्ष प्रमुख पिणु पाटील व चंदगड तालुक्यातील इतर कार्यकर्ते. 
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

       पश्चिम घाटातील विपुल जैवविविधता व निसर्ग संपन्नता लाभलेल्या चंदगड तालुक्याच्या पर्यटन विकासासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रयत्न करावेत. अशा आशयाचे निवेदन प्रताप उर्फ पिनू पाटील उपजिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी राज ठाकरे यांना नुकतेच दिले आहे.

किल्ले पारगड

         पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण टोकावर गोवा व कर्नाटक राज्याच्या सीमेवर वसलेला चंदगड तालुका पर्यटन क्षेत्र घोषित करुन तरुणांना व्यवसायाची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी राज ठाकरे यांनी शासन व प्रशासनाचे लक्ष वेधावे अशी अपेक्षा निवेदनातून व्यक्त केली आहे.

           शासनाचे चंदगडच्या सोयी सुविधांकडे नेहमीच दुर्लक्ष आहे. दुर्गम असला तरी हा तालुका आर्थिक दृष्ट्या सधन आहे. येथे काजू व ऊसाच्या नगदी पिकाबरोबर अनेक पिके येतात. निसर्ग संपदेने नटलेल्या तालुक्यात ४ मध्यम प्रकल्प व १९ लघु पाटबंधारे तलावामुळे शेती बारमाही हिरवीगार असते. येथील मुख्य बाजारपेठ बेळगाव आहे. 
         तालुक्यात ३ साखर कारखाने आहेत. येथील ऐतिहासिक किल्ले  पारगड, कलानिधीगड, महिपाळगड, गंधर्वगड, स्वप्नवेल पॉइंट, पुरातन वैजनाथ मंदिर, तिलारी धरण व जलविद्युत प्रकल्प, किटवाड, सुंडी, रातोबा धबधबे, ढोलगरवाडीचे जगप्रसिद्ध सर्पोद्यान, नजिकचे आंबोली हे थंड हवेचे ठिकाण यामुळे महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक राज्यांसह देशविदेशातील लाखो पर्यटक दरवर्षी या ठिकाणांना भेटी देतात. तथापि ही ठिकाणे पर्यटन दृष्ट्या विकसित होणे गरजेचे आहे. 

                                               
         तरुणांना उद्योगाच्या संधीसाठी  काजूवर प्रक्रिया करणारे व अन्य उद्योग,  तालुक्यातील अनेक तरुण पुणे, मुंबई तसेच विदेशात उत्तम केटरिंगचे काम करतात त्यांना आपल्याच तालुक्यात व्यवसाय निर्मितीला चालना देणे गरजेचे आहे. अशा आशयाचे निवेदन प्रताप उर्फ पीनू पाटील तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुक्यातील पदाधिकारी यांच्या वतीने राज ठाकरे यांना देण्यात आले.

No comments:

Post a Comment