माणगाव बंधाऱ्यानजीकचा रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा - चंदगड लाईव्ह न्युज

19 November 2022

माणगाव बंधाऱ्यानजीकचा रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
     माणगाव (ता. चंदगड) येथील ताम्रपर्णी नदीवरील पुलाच्या दुतर्फा मोठमोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. तीव्र उताराच्या या रस्त्यावरून वाहनधारकांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. हे ठिकाण मृत्यूचा सापळा बनले असून रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी वाहनधारक व नागरिकांतून होत आहे.
  चंदगड परिसराला कोवाड, दड्डी, हत्तरगी,  संकेश्वर ते कोल्हापूरशी जोडणारा महत्त्वाचा आणि मोठ्या वर्दळीचा रस्ता आहे. पाटणे फाटा ते कोवाड, कामेवाडी रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम गेल्या काही वर्षात रडत खडत सुरू आहे. तथापि माणगाव गावापासून ते ताम्रपर्णी नदीवरील पुलाच्या पुढील सीमदेव मंदिरापर्यंतचा एक किलोमीटर रस्ता ठीक ठिकाणी खचला आहे. खड्ड्यामुळे रस्त्याची चाळण झाली आहे.  पुलाच्या दोन्ही बाजूचा रस्ता अधिकच धोकादायक बनला आहे. तीव्र उतारावरून येणारी वाहने आवरणे वाहनधारकांना कठीण जात आहे.
 साखर कारखान्यांच्या गळीत हंगाम सुरू झाल्याने उसाने भरलेले ट्रॅक्टर दोन्हीकडे ये-जा करत असतात. अशावेळी वाहनांना मोठा अपघात होण्याचा संभव आहे. पुलावरील काँक्रीट रस्त्याची अवस्था याहून वाईट आहे. 
  एकंदरीत पाटणे फाटा ते कामेवाडी या रस्त्यावर ठराविक अपवाद वगळता वाहनधारकांना खड्ड्यातूनच मार्ग काढावा लागत आहेत त्यामुळे संपूर्ण २५ किलोमीटर रस्त्याच्या पॅचवर्क चे काम तात्काळ हाती घ्यावी अशी मागणी होत आहे.



No comments:

Post a Comment