चंदगड तालुक्यातील २४ ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता, अन्य ग्रामपंचायतीवर स्थानिक आघाड्यांचे वर्चस्व, वाचा अन्य ग्रामपंचायतीमधील सत्तांतरे....... - चंदगड लाईव्ह न्युज

20 December 2022

चंदगड तालुक्यातील २४ ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता, अन्य ग्रामपंचायतीवर स्थानिक आघाड्यांचे वर्चस्व, वाचा अन्य ग्रामपंचायतीमधील सत्तांतरे.......

जंगमहट्टी (ता. चंदगड) येथील विजय उमेदवारासह भाजप कार्यालयासमोर आनंदोत्सव साजरा करताना कार्यकर्ते.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

     चंदगड तालुक्यात मंगळवारी (ता. २०) जाहिर झालेल्या ३७ ग्रामपंचायतीच्या निकालामध्ये भाजपला सर्वांधिक २४ ग्रामपंचायतीवर सत्ता स्थापन करण्यात यश आले आहे. तर उर्वरीत ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी व इतर स्थानिक आघाड्यांनी वर्चस्व मिळविले आहे.

       चंदगड तालुक्यात एकूण ४० ग्रामपंचायतीचा निवडणुक कार्यक्रम जाहिर झाला होता. यापैकी अर्ज माघारीनंतर नागनवाडी, लक्कीकट्टे, सातवणे या ३ ग्रामपंचायती पुर्णता बिनविरोध झाल्या. तर खालसा गुडवळे, खालसा कोंळीद्रे, जेलुगडे, महिपाळगड या ग्रामपंचायती अंशत: बिनविरोध झाल्या. यापैकी सहा ग्रामपंचायतीवर भाजपचे सरपंच निवडून आले. 

डुक्करवाडी (ता. चंदगड) येथील सुजाता यादव (सरपंच), आप्पाजी वर्पे, दत्तु वर्पे, रघुनाथ गावडे या विजयी उमेदवारासह समर्थक.

        आज मंगळवार दि. २० डिसेंबर रोजी तहसील कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये सकाळी ९ वाजल्यापासून ३७  ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. १२ टेबलवर ही प्रक्रिया पार पडली. सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी सर्वप्रथम हेरे ग्रामपंचायतीचा निकाल घोषित करण्यात आला. दुपारी बारा वाजेपर्यंत सर्व ग्रामपंचायतीचे सर्व निकाल घोषित करण्यात आले. जसे-जसे ग्रामपंचायत निकाल घोषित होत होते, तस-तसे संबंधित ग्रामपंचायतीचे उमेदवारांसह त्यांचे समर्थक फटाक्यांची आतीषबाजी करत गुलालाची उधळण करत आनंद व्यक्त करत होते. मतमोजणी प्रक्रिया दरम्यान अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

          निवडणूक निरीक्षक तथा उपजिल्हाधिकारी विवेक काळे, निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार विनोद रणवरे, नायब तहसीलदार सचिन आखाडे, निवासी नायब तहसीलदार हेमंत कामत यांच्या मार्गदर्शनाखाली अव्वळ कारकून प्रकाश जाधव, अमर साळुंखे, निहाल मुल्ला, कपिल बिरजे यांच्यासह  सव्वाशेहून अधिक कर्मचाऱ्यांनी मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. तालुक्यात निवडणुक लागलेल्या गावामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती पोलिस निरिक्षक संतोष घोळवे यांनी दिली. 

         प्रत्यक्ष ३३ ग्रामपंचायतीसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत अडकुर, कडलगे बुद्रुक, जंगमहट्टी, काजिर्णे-म्हांळुगे, कुदनुर, करंजगाव, हिंडगाव- फाटकवाडी, कोरज-गंधर्वगड-कुर्तनवाडी, गवसे, शिनोळी बुद्रुक, व राजगीळी खुर्द या ग्रामपंचायतीमध्ये मतदारांनी सत्तांतर घडवले. अडकूर, कडलगे बुद्रुक, जंगमहट्टी, कुदनुर, राजगोळी खुर्द येथे काँग्रेसला धक्का देत भाजपने सत्ता हस्तगत केली.

        काजिर्णे-म्हाळुंगे, हिंडगाव-फाटकवाडी, कोरज-गंधर्वगड-कुर्तनवाडी या ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीने भाजपकडून सत्ता हिसकावून घेतली. गवसे येथे भाजपने सत्ता हस्तगत करत राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का दिला. शिनोळी बुद्रुक येथे शिंदे प्रणित शिवसेना गटाला धक्का देत भरमू पाटील राजेश पाटील यांच्या युतीने सत्ता हस्तगत केली. 

         शिरगाव ग्रामपंचायतीमध्ये असलेली भाजपची सत्ता राष्ट्रवादीने काबीज केली. या ठिकाणी भाजपच्या दोन जागा बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित सरपंच पदासह सात जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सरपंचासह उर्वरीत सात सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आणले. 

२४ ग्रामपंचायतीवर भाजपचे सरपंच - पत्रकार परिषदेत माहिती

          ४० ग्रामपंचायतीच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत २४ ग्रामपंचायतीमध्ये भाजपचे सरपंच निवडून आले. यामध्ये अडकुर, अलबादेवी, विंझणे, सातवणे, केंचेवाडी, खालसा कोळींद्रे, हेरे, खालसा गुडवळे, मोटणवाडी, जेलुगडे, लक्कीकट्टे, सरोळी, शिनोळी बुद्रुक, राजगोळी बुद्रुक, कागणी, तेऊरवाडी, कुदनुर, जंगमहट्टी, तडशिनहाळ, कडलगे बुद्रुक, कोकरे, नागनवाडी, गवसे व डुक्करवाडी या ग्रामपंचायतीमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरपंच निवडून आल्याची माहीती भाजपचे राज्य कार्यकारणी सदस्य शिवाजीराव पाटील व माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील यांनी चंदगड येथील भाजप कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. 

No comments:

Post a Comment