अपघातात जखमी झालेल्या मजरे कारवे येथील डॉक्टरचा मृत्यू, दोन वर्षे ९ महिने दिली मृत्यूशी झुंज - चंदगड लाईव्ह न्युज

18 January 2023

अपघातात जखमी झालेल्या मजरे कारवे येथील डॉक्टरचा मृत्यू, दोन वर्षे ९ महिने दिली मृत्यूशी झुंज


डॉ. सुरेश रामचंद्र ओऊळकर

चंदगड / प्रतिनिधी
एप्रिल २०२० साली कोरोना काळात जंगमहट्टी येथील एक रुग्णाच्या तपासणीसाठी जात असताना रस्त्यात आडवा टाकलेल्या ओंडक्याला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात जखमी झालेल्या मजरे कार्वे ( मूळ गाव गौळवाडी ता. चंदगड ) येथील डॉ. सुरेश रामचंद्र ओऊळकर ( वय वर्ष ६०) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 
  ओऊळकर हे जंगमहट्टी या गावाला कोरोना काळात रुग्णांच्या तपासणीसाठी  रोज जात होते.कोरोना काळात बाहेरील लोकांना गावबंदी केली होती. त्यासाठी गावांत प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. दरम्यान दि. ४ एप्रिल २०२० रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास जात असताना ग्रामस्थांनी रस्त्यांवर लाकडी ओंडके टाकून रस्ता बंद केला होता. एका वळणावर रस्त्यात टाकलेले ओंडके दिसले नसल्याने डॉक्टर ओऊळकर यांची दुचाकी धडकली. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि ते कोम्यात गेले. त्यानंतर ते अंथरुणावर खिळून राहिले होते. अखेर २ वर्षे ९ महिन्यांनी त्यांची जगण्याची झुंज अयशस्वी ठरली. कोरोना काळातही त्यांनी जिवाजी बाजी लावत रुग्णांची चांगली सेवा केली होती. रुग्ण वाचवणाऱ्या डॉक्टरांच्यावर अशी वेळ आल्याने कार्वे परिसरात शोककळा पसरली. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा,मुलगी,  दोन भाऊ,भावजयी,  बहिणी असा मोठा परिवार आहे. 


चौकट : 

मुलीला बापाचे अखेरचे  दर्शन मिळालेच नाही


डॉक्टर सुरेश यांची मुलगी मेघा ही ऑस्ट्रेलिया येथे पती, मुलांसह वास्तव्याला आहे. बाप- लेकीचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. मात्र मेघा सात महिन्यांची गरोदर असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रवास करणे शक्य नसल्याने बापाच्या अंत्यसंस्काराला मुलगी मुकली. 


No comments:

Post a Comment