गावच्या विकासासाठी गट विसरून एकत्र या -घनश्याम पाऊसकर, दाटे येथे जलजीवन पाणी पुरवठा योजनेचा प्रारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

15 January 2023

गावच्या विकासासाठी गट विसरून एकत्र या -घनश्याम पाऊसकर, दाटे येथे जलजीवन पाणी पुरवठा योजनेचा प्रारंभ


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

"नदी उशाला, कोरड घशाला" अशा अवस्थेत दाटे ग्रामस्थांनी कित्येक वर्ष काढली.आता पर्यंत गावासाठी पिण्याच्या पाण्याच्या अनेक योजना राबविल्या गेल्या पण गावची तहान मात्र भागली नाही. 

गावच्या विकासाचा ध्यास घेऊन दाटे (ता. चंदगड) येथील मंत्रालयीन कक्ष अधिकारी घनश्याम पाऊसकर यांनी ग्राम पंचायतीच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा योजनेसाठी जागा उपलब्ध करून घेण्यापासून ते आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यापर्यंत विशेष प्रयत्न केले. "गटतट विसरून एकत्र आल्यास गावचा विकास सहज शक्य आहे. प्रत्येकाने सामाजिक भान ठेवून वागले पाहिजे" असे प्रतिपादन घनश्याम पाऊसकर यांनी केले. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अमोल कांबळे होते. यावेळी संगणक अभियंता विनायक पाऊसकर यांच्या हस्ते जल जीवन पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ करण्यात आला. 'गावच्या हितासाठी प्रातिष्ठा बाजुला ठेवून काम केल्यास गावचा विकास होण्यास वेळ लागणार नाही' असे मत विनायक पाऊसकर यांनी मांडले.

यावेळी ग्रामस्थांनी वारकरी संप्रदायाचा वारसा सांभाळत गावातून जल-दिंडी काढली. यावेळी उद्योगपती प्रल्हाद जोशी, सरंपच अमोल कांबळे, मारूती किंदळेकर यांची मनोगते झाली.

कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य संतोष मोरे,मधुरा साबळे, माधुरी मोरे, संजय जाधव, संदिप गुरव  उपस्थित होते. सुत्रसंचालन संजय साबळे तर आभार उप सरपंच किरण नाईक यांनी मानले.



No comments:

Post a Comment