आंतर विद्यापीठ शरीर सौष्ठव स्पर्धेत रोहित भोगण ठरला सुवर्णपदकाचा मानकरी - चंदगड लाईव्ह न्युज

27 February 2023

आंतर विद्यापीठ शरीर सौष्ठव स्पर्धेत रोहित भोगण ठरला सुवर्णपदकाचा मानकरी

मेंगलोर येथे मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदकाची ट्रॉफी स्वीकारताना रोहित भोगण.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

          अखिल भारतीय आंतर विद्यापीठ शरीर सौष्ठव स्पर्धेत रोहित राजू  भोगण सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. येनेपोया यूनिवर्सिटी, मेंगलोर (कर्नाटक) येथे नुकत्याच पार पडलेल्या या स्पर्धेत ७० किलो वजनी गटात त्याने हे निर्विवाद यश संपादन केले. कागणी (ता. चंदगड) येथील रोहित सध्या कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय कोवाड येथे बी कॉम भाग ३ मध्ये शिकत आहे. प्रचलित क्रीडा प्रकार सोडून वेगळी वाट चोखाळत आठ वर्षे अपार कष्ट व जिद्दीच्या जोरावर त्याने राष्ट्रीय स्तरावरील यशाला गवसणी घातली. चंदगड तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील युवा वर्गासमोर त्याचे यश अनुकरणीय ठरले आहे. 

       त्याला प्रशिक्षक संजय धुरे, राजेश वडाम, विशाल देवकर यांच्यासह महाविद्यालयातील क्रीडा विभाग प्रमुख आर. टी. पाटील यांचे मार्गदर्शन तर आई, वडिल राजू महादेव भोगण यांचे पाठबळ लाभले.

        शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत घेण्यात आलेल्या शरीर सौष्ठव स्पर्धेत सलग तीन वर्षे सुवर्णपदक पटकावत तो राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरला होता. रोहितच्या उत्तुंग यशाबद्दल चंदगड तालुका व जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment