अध्ययन, अध्यापन, शब्दसंपत्ती, अर्थपूर्ण विचार यातून विद्यार्थी आणि शिक्षक घडतात - डॉ. बी. एम. हिर्डेकर, हलकर्णी महाविद्यालयात 'राज्यस्तरीय चर्चासत्र संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

19 February 2023

अध्ययन, अध्यापन, शब्दसंपत्ती, अर्थपूर्ण विचार यातून विद्यार्थी आणि शिक्षक घडतात - डॉ. बी. एम. हिर्डेकर, हलकर्णी महाविद्यालयात 'राज्यस्तरीय चर्चासत्र संपन्न

हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात बोलताना डॉ. बी. एम. हिर्डेकर व्यासपीठावर गोपाळराव पाटील, अशोक जाधव, संजय पाटील, विशाल पाटील, डॉ. अर्जुन चव्हाण, डॉ. अरुण शिंदे, डॉ. रघुनाथ कडाकणे आदी मान्यवर.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        ज्ञान ही बदलासाठी गरजेची गोष्ट आहे. भाषा ही स्वयंस्फूर्त आहे. माणूस व्यक्त होतोच होतो. भाषेवर कुणाची मालकी नसते. भाषेची संस्कृती समजून घ्या. माणसांच्या संवादाचा सेतू म्हणजे भाषा होय. भाषा माणूस व्हायला शिकवते. प्रत्येक नेतृत्वात भाषेला संधी आहे. सर्व भाषा जागतिक आहेत. विदयार्थी ही शिक्षकांची ऊर्जाकेंद्र असतात. अध्ययन, अध्यापन, शब्दसंपत्ती, अर्थपूर्ण विचार यातून  विद्यार्थी आणि शिक्षक घडत असतात.अध्यापन ही एक कला आहे. शिक्षकांनी ती आत्मसात करावी. चांगली भाषा अवगत करा" असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे माजी परिक्षा नियंत्रक डॉ. बी.एम. हिर्डेकर यांनी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ विठठल पाटील कनिष्ठ महाविद्यालय हलकर्णी (ता. चंदगड) येथे बीजभाषक म्हणून राज्यस्तरीय चर्चासत्रात' केले. 'माध्यमिक व उच्चमाध्यमिक स्तरावरील भाषांचे अध्यापन' (समस्या, परिणाम व उपाय') या विषयावर मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांचे वतीने चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. दौलत विश्वस्थ संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील अध्यक्षस्थानी होते. 

       स्वागत प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर, प्रा. पी. ए. पाटील यांनी केले. यावेळी व्यासपीठावर दौलत विश्वस्थ संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील, डॉ. बी. एम. हिर्डेकर, दौलत विश्वस्थ संस्थेचे अध्यक्ष अशोकराव जाधव, उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विशाल पाटील, डॉ अर्जुन चव्हाण माजी विभागप्रमुख हिंदी विभाग शिवाजी विद्यापीठ, नाईट कॉलेज कोल्हापूरचे मराठी विभागप्रमुख डॉ. अरुण शिंदे, राजाराम कॉलेज कोल्हापूर इंग्रजी विभागप्रमुख डॉ. रघुनाथ कडाकणे, प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर, समन्वयक प्रा.पी.ए.पाटील, नॅक समन्वयक डॉ. राजेश घोरपडे, कार्यालयीन अधिक्षक प्रशांत शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते. 

           प्रास्ताविक व परिचय प्रा. डॉ. अनिल गवळी यांनी करून दिला. दौलत विश्वस्थ संस्थेचे अध्यक्ष अशोकराव जाधव यांनी रोपट्याला पाणी घालून चर्चासत्राचे उद्घाटन केले. मराठी व इंग्रजी विभागांच्या भित्ती पत्रकांचे अनावरण मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार यांच्या 'अक्षरलिपी' या ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

          अध्यक्षीय मनोगतात बोलताना गोपाळराव पाटील म्हणाले, ' भाषेसाठी कोणतेही आरक्षण नाही. भाषेची गोडी विधार्थ्यांच्यात रुजावी. जगाची संस्कृती भाषेमुळे अवगत होते. संभाषणवृत्ती वाढवा.'

      पुढील सत्रात "मराठीचे अध्यापन 'याविषयावर बोलताना डॉ. अरुण शिंदे म्हणाले, "विद्यार्थी चौकस घडावा यासाठी भाषेतून संस्कृतीच संवर्धन करणारी पिढी घडवा भाषेचा शिक्षक ही शाळा-कॉलेजची ओळख असते. भाषेचा शिक्षक ही सांस्कृतिक ओळख बनावी. संवादातून विदयार्थ्यांना आत्मविश्वास द्या. विदयार्थ्याच्या बोलीला प्रतिष्ठा दया. भाषा हे सांस्कृतिक, वर्चस्वाच महत्वाच हत्यार आहे. मुकया आवाजांना संधी द्या. प्रमाण मराठी बरोबर बोलीला महत्व दया. मुलांना त्यांच्या कलांनी वाढू दया.!" 

      तसेच 'हिंदीचे अध्यापन' या विषयावर बोलताना डॉ अर्जुन चव्हाण म्हणाले की, "भाषा व्यक्तिमत्व विकासाचे महत्वाचे साधन आहे. तंत्रज्ञानाच्याबाबतीत आजची पिढी अग्रेसर आहे.  शिक्षकाला कोणता पर्याय नसतो. आर्थिक कुचंबनेत शिक्षक दबलेला असेल तर तो तळमळीने शिकवणार का ? विद्यार्थी काळाबरोबर घडत असतो. भाषेसमोर अनेक आव्हाने आहेत. भाषा हि वाहत्या नदीसारखी आहे, हिंदी भाषा विविध क्षेत्रात  शिकवणीसाठी प्रभावी ठरत आहे.  प्रत्येक भाषेत मोठी ताकद आहे."

      तर इंग्रजीचे अध्यापन' या विषयावर बोलताना प्रा. डॉ. रघुनाथ कडाकणे म्हणाले, "शिकवणे म्हणजे शिकण्याचा अनुभव घेणे होय.भाषेत कौशल्ये महत्त्वाची आहेत. शिक्षक हा विद्यार्थ्यासाठी मार्गदर्शक असतो. अध्यापनासाठी वाचन आणि लेखन आवश्यक आहे. शिक्षकांनी वर्गात संतुलन निर्माण केले पाहिजे. भाषा शिक्षक हा प्रामाणिक असावा. इंग्रजी मराठी आणि हिंदी हे विषय नाहीत तर भाषा आहेत." 

      पाचव्या सत्रात एकत्रित खुली चर्चा आयोजित करण्यात आली होती यामध्ये अनेकांनी आपले मत व्यक्त केले. सर्व मान्यवर मंडळींनी मार्गदर्शन केले. या सत्राचे संयोजन प्रा. डॉ. आय. आर. जरळी आणि प्रा. एस. एन. खरुजकर यांनी केले. तर शेवटच्या सत्रात समारोप व प्रमाणपत्रे देण्यात आली. दौलत विश्वस्थ संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील, डॉ. बी. एम. हिर्डेकर, डॉ. अर्जुन चव्हाण, डॉ. अरुण शिंदे, डॉ. रघुनाथ कडाकणे, प्राचार्य. डॉ. बी. डी. अजळकर आदी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली. 

      याप्रसंगी विविध शाळातील शिक्षक, महाविधालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. चंद्रकांत पोतदार आणि प्रा. व्ही. व्ही. कोलकार यांनी सुत्रसंचालन केले तर प्रा. यु. एस. पाटील यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment