किल्ले पारगडसाठी ८०.५६ लाखांची नपापु. योजना, प्रशासकीय मंजुरीचा लेखी आदेश...! प्राणांतिक उपोषणाची यशस्वी सांगता - चंदगड लाईव्ह न्युज

02 March 2023

किल्ले पारगडसाठी ८०.५६ लाखांची नपापु. योजना, प्रशासकीय मंजुरीचा लेखी आदेश...! प्राणांतिक उपोषणाची यशस्वी सांगता

लक्ष्मणराव गावडे यांच्या हस्ते सरबत घेऊन उपोषणाची सांगता करताना शेलार व त्यांचे सहकारी.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
किल्ले पारगड ग्रामस्थांना गेली अनेक वर्षे भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. दरवर्षी दिल्या जाणाऱ्या पोकळ आश्वासनांनी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारत चंदगड पंचायत समिती समोर १ मार्चपासून सामाजिक कार्यकर्ते रघुवीर खंडोजी शेलार यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू केले. चंदगड तालुक्याच्या विविध स्तरातून या उपोषणाला मोठा पाठिंबा लाभला होता.
अधिकाऱ्यांच्या कडून प्रशासकीय मान्यता आदेश स्वीकारताना ग्रामस्थ.
  पारगड वासियांची रास्त मागणी व तालुक्यातील जनरेटा पाहता उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी मिरवेल ग्रामपंचायत अंतर्गत पारगड नळ पाणी पुरवठा योजनेसाठी ८० लाख ५६ हजार ९०६  रुपयेच्या कामास  प्रशासकीय मंजुरी (वर्क ऑर्डर) दिली. सदरचे काम नऊ महिन्यात पूर्ण करण्याचे लेखी आदेश दिले असून  योजनेसाठी लागणारी रुपये- १६११३८/- इतकी सुरक्षा रक्कम केडीसीसी बँकेत चलनाने भरण्यात आली आहे. या आदेशानंतर उपोषणकर्त्यांनी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण गावडे यांच्या हस्ते सरबत घेऊन उपोषण थांबवले. या कामी भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
     उपोषणास तंटामुक्त समिती अध्यक्ष रघुवीर शेलार यांच्यासह मिरवेल, नामखोल, पारगड ग्रुप ग्रामपंचायत सरपंच संतोष बाबाजी पवार, रमावती राजाराम कांबळे, प्रकाश विष्णू पवार, शारदा रमेश जांभळे, प्रकाश कृष्णा चिरमुरे, रुक्मिणी पांडुरंग कांबळे, राजश्री राजेश कांबळे, न्हानू जांभळे, निशिगंधा नंदकिशोर डांगे, अलका गोविंद कांबळे, शांताराम भिवा बेर्डे, रामचंद्र बाबाजी नांगरे, सुनील एकनाथ मालुसरे, चंद्रकांत शांताराम पवार, दीपक माळी, अर्जुन धोंडू तांबे, संदीप कांबळे, संजय फटी कांबळे, मीरा मनोहर कांबळे, मधुकर खंडू चिरमुरे, सुरेश मालुसरे आदी ग्रामस्थांनी सहभाग घेतला. यावेळी माजी मंत्री भरमूआण्णा पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष नामदेव पाटील, हनीफ सय्यद, पंडित कांबळे आदींनी  उपस्थित राहून पाठिंबा दिला. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment