निट्टूर कुस्ती मैदान महाराष्ट्राच्या पैलवानांनी गाजवले! पंजाब, कर्नाटक, हरियाणा चे मल्ल पराभूत, पै. उमेश चव्हाण कडून पंजाब केसरी पै. रिंकू खन्ना चितपट - चंदगड लाईव्ह न्युज

23 March 2023

निट्टूर कुस्ती मैदान महाराष्ट्राच्या पैलवानांनी गाजवले! पंजाब, कर्नाटक, हरियाणा चे मल्ल पराभूत, पै. उमेश चव्हाण कडून पंजाब केसरी पै. रिंकू खन्ना चितपट

कुस्तीतील एक अटीतटीचा क्षण

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
निट्टूर, ता. चंदगड  कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत महाराष्ट्र चॅम्पियन पै. उमेश चव्हाण शाहू आखाडा यांने पंजाब केसरी पै. रिंकू खन्ना यास घुटना डावावर तीन मिनिटात चितपट केले. क्रमांक दोनच्या कुस्तीत महाराष्ट्र चॅम्पियन पै. भैय्या पवार शाहू आखाडा याने पैलवान गुताप्पा काटे कर्नाटक केसरी यास एकेरी पट डावावर चितपट केले तर क्रमांक तीनची कुस्ती किर्तीकुमार बेनके, काशीराम वस्ताद चा पठ्ठा (कारवे ता. चंदगड) याने राकेश कुमार हरियाणा केसरी याला केवळ दोन मिनिटात दुहेरी पट काढत चितपट करून हजारो कुस्ती शौकीनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
प्रथम क्रमांकाची कुस्ती जिंकल्यानंतर पै. उमेश चव्हाणचे विजेतेपदाचा चषक व बक्षीस देऊन अभिनंदन करताना मान्यवर.

    प्रथम क्रमांकची कुस्ती माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील, युवराज पाटील व मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. आखाड्याचे पूजन नागोजी पाटील व सतबा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
  मैदानात नियोजित ५२ कुस्त्यांसह लहान मोठ्या शंभर पेक्षा अधिक चटकदार काटा जोड कुस्त्या झाल्या. क्रमांक चारच्या कुस्तीत रोहित कंग्राळी याने ओंकार पाटील राशिवडे याचेवर विजय मिळविला. महत्त्वाच्या अन्य कुस्त्यांमध्ये पै विक्रम शिनोळी, कामेश कंग्राळी, किरण शेंडगे शाहू आखाडा, अमोल नरुटे, गणेश मलतवाडी, अतुल मगदूम मोतीबाग, ओमकार पाटील राशिवडे, हर्ष पाटील कंग्राळी, सौरभ सुतार तुर्केवाडी, बालाजी खरात शाहू आखाडा,  ओम राशीवडे, राज मार्डेश्वर, ऋतिक पाटील धुमडेवाडी, सारंग पाटील राशिवडे यांनी प्रतिस्पर्ध्यावर नेत्रदीपक विजय मिळवले. अनुक्रमे ८, १० व १२ क्रमांकाच्या शुभम पाटील तेऊरवाडी मोतीबाग विरुद्ध सुमित कडोली बेळगाव, पिंपळ घुले शाहू आखाडा विरुद्ध संकल्प येळवे कंग्राळी, तात्या घुले शाहू आखाडा विरुद्ध गौस दर्गा बेळगाव या कुस्त्या बरोबरीत सोडवण्यात आल्या. याशिवाय कार्तिक जाधव, साहिल नेसरकर, मुबारक मुल्ला, निखिल पाटील, शुभम पाटील, तुषार हडलगेकर, गणेश सुतार, पवन पाटील, श्रीतेज पाटील, अविनाश पाटील, सत्यम पाटील, सोहम साळुंखे आदी निट्टूर तालीमच्या पैलवानांनी विजय मिळवत मैदानात रंगत आणली. सालाबाद प्रमाणे भीमा कुरबुर यांनी लावलेल्या जंगी मेंढ्यासाठी पार्थ पाटील कंग्राळी व ओमकार पाटील राशिवडे यांच्यातील तब्बल दीड तास चाललेली कुस्ती बरोबरीत सुटली. 
प्रथम क्रमांकाची कुस्ती लावताना मान्यवर

यावेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेते मुंबई महापौर केसरी पैलवान मारुती नाईक (निट्टूर) यांना आजारी अवस्थेत व्हीलचेअर वरून आणून त्यांच्या कुस्तीतील योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला.
आखाडा पंच म्हणून गावडू पाटील, भैरू पाटील, भरमू पाटील, नेत्रपाल हडलगेकर, यल्लाप्पा पाटील, कृष्णा पाटील मारुती पाटील आदींनी काम पाहिले कृष्णा चौगुले राशिवडेकर यांनी धावते समालोचन केले. वाय. व्ही. कांबळे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment