व्यवसायात स्वत:ची ओळख निर्माण करा - अमित कुलकर्णी, हलकर्णी महाविद्यालयात 'लघुउद्योग: व्यवसाय आणि संधी' या विषयावर कार्यशाळा - चंदगड लाईव्ह न्युज

24 March 2023

व्यवसायात स्वत:ची ओळख निर्माण करा - अमित कुलकर्णी, हलकर्णी महाविद्यालयात 'लघुउद्योग: व्यवसाय आणि संधी' या विषयावर कार्यशाळा

       


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       कोणताही व्यवसाय करताना व्यवसायात स्वतःची ओळख निर्माण करणे महत्त्वाचे आहे. उद्योगात चढउतार असतोच, मात्र संयम संघर्ष आणि मनाची तयारी म्हणजे यशस्वी उद्योजक होय. लोकांसाठी नको तर स्वतःसाठी राबा.अशा प्रकारची कामाची निष्ठा महत्त्वाची आहे.' असे प्रतिपादन अमित कुलकर्णी यांनी केले.

       ते यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी (ता. चंदगड) येथे शिवाजी विद्यापीठाच्या शिवराज महाविद्यालय, गडहिग्लज अग्रणी योजनेअंतर्गत संपन्न झालेल्या 'लघुउद्योग: व्यवसाय आणि संधी' या विषयावरील कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून वृक्ष सवर्धन संदेशाने उद्घाटन संपन्न झाले. प्रास्ताविक समन्वयक डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी केले. अध्यक्षस्थानी संजय पाटील होते.

           दुसऱ्या सत्रात विठ्ठल पाटील( शिनोळी) यांनी 'कामासाठी मनाची एकाग्रता असेल आणि व्यवसायाची महत्त्वाकांक्षा असेल तर आपण नक्कीच आपल्या व्यवसायात यशस्वी होतो.  शासकीय योजनांचा योग्य फायदा घेऊन आपल्या कामाची दृष्टी वाढवावी. व्यवसायात परिश्रमाची तयारी ठेवणे गरजेचे असते. कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय पाटील म्हणाले ,'कुठलाही व्यवसाय करताना चिकाटी आणि जिद्द ठेवून करा. यश आपलेच आहे. लघुउद्योग या विषयावर अशी आणखी कार्यशाळा घेऊन चंदगड तालुक्यातील नव तरुणांना मार्गदर्शन होणे गरजेचे आहे.

    प्रा. पी. ए. पाटील म्हणाले, 'कुठल्याही व्यवसायाकडे बघताना फायद्यापेक्षा व्यवसायातील चिकाटी आणि ग्राहकाचे समाधान पाहिले पाहिजे.' या कार्यशाळेप्रसंगी आजरा, गडहिंग्लज, चंदगड तालुक्यातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या मनोगतानंतर उपस्थित विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी खुली चर्चा केली. मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित केल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी माधुरी सुतार यांनी केले तर आभार प्राध्यापक अनंत कलजी यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील डॉ. राजेश घोरपडे प्रा. के. एम. गोनुगडे, प्रा. डॉ. ए. पी. गवळी, डॉ. जरळी, प्रा. मारुताई पाटील यांचेसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment