भारतीय घटनेचे शिल्पकार - डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, जयंती विशेष........... - चंदगड लाईव्ह न्युज

13 April 2023

भारतीय घटनेचे शिल्पकार - डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, जयंती विशेष...........

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर


       जो जन्माला येतो तो कधीतरी मृत्यू पावणारच असतो. परंतु जिवंत असताना त्याने जर समाजोपयोगी चांगले कार्य केले तर त्या माणसाच्या मृत्यू नंतरही आपण व आपला समाज विसरु शकत नाही. अशा महान व थोर मानवाचे लोक गुणगान गातच राहतात.

        अशा थोर माणसाचे कार्य. त्याचे चरित्र, त्यानी जगलेले आयुष्य याची खरी किंमत त्याच्या मृत्यूनंतर जगाला कळते. त्यांच्या कार्यातील आणि त्यांच्या आयुष्यातील त्या गोष्टी मानवतेला व मानव जातीला उपयोगी असतात. अशा गोष्टी समाजात चिरकाल टिकतात व कायम स्वरुपी राहतात.

        'एखादया माणसाने आपल्या मागे किती द्रव्य (पैसा) ठेवला आहे. किती वस्तू ठेवल्या या गोष्टी इतिहासात गणल्या जात नाही.पण माणूस गेल्यास इतिहासात एकच प्रश्न विचारतो की, या गेलेल्या माणसात सुखसोयीत व सुखसमाधानात या माणसाने समाजासाठी व समाजात कोणती भर घातली असे प्रश्न इतिहासात असतात. ज्यांनी आपला देह मानवजातीसाठी झिजविला त्याचीच स्मृती, मानव आणि समाज आपल्या उराशी जपून ठेवतो. अशा थोर माणसांची हदये मानव जातीच्या सहानुभूमीने व दया बुद्धीने भरलेली असतात.त्यानाच जग आपले प्रेम अर्पण करीत असतो.

       डाॅ.बाबासाहेब आंबेडकर लहानपणापासून अत्यंत हुशार होते.पण त्याकाळी अस्पृश्यांना अत्यंत वाईट वागणूक मिळत असतं सवर्ण लोक या अस्पृश्यतेची झळ डाॅ.बाबासाहेबांना विद्यार्थी दशेतच बसली होती.

          केवळ अस्पृश्य म्हणून त्यांना शिकता आले नाही. त्या मुळे शाळेत त्यांना पाशिऀयन भाषा शिकावी लागली. संस्कृत विषय शिकता आला नव्हता तरी संस्कृत विषयाचा अभ्यास त्यांनी स्वकष्टाने केला. १९०७ साली मॅट्रिक झाल्यावर त्यांनी एलफिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. १९१२ साली ते बी.ए.झाले. बडोदा सरकारची शिष्यवृत्ती घेऊन आंबेडकरांनी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून १९१५ मध्ये एम. ए. ची पदवी घेतली त्या नंतर पी. एच. डी. पदवी मिळवली अमेरिकेतून परत आल्यावर त्यांना बडोदा संस्थानमध्ये नोकरी मिळाली. पण नोकरी करत असताना तिथेही त्यांना अस्पृश्यतेचे चटके बसले. केवळ अस्पृश्य म्हणून त्यांना राहावयास जागा मिळत नव्हती. कार्यालयातील हाताखालचे लोकसुद्धा डाॅ.बाबासाहेबांशी तुच्छतेने वागत असे.त्यामुळे त्यांचे मन अतिशय दुःखी झाले.

        आपल्यासारख्या उच्च विद्याविभूषिताला जर अशी अमानुष वागणूक मिळत असेल तर खेड्यापाड्यातील अज्ञान, दुखदारिद्रयात पिढ्यानपिढया खितपत पडलेल्या आपल्या अस्पृश्य समाजाला कोणत्या प्रकारची वागणूक मिळत असेल, त्यांना किती बळ सोसावा लागत असेल या विचारांनी ते अतिशय निराश व दुःखी झाले होते.समाजांत होणारा अन्याय दूर करण्यासाठी व अन्यायाला वाचा फोडण्यासाठी इ.स.१९२० मध्ये 'मूकनायक, हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केले.यातूनच त्यांनी अस्पृश्यांच्या सामाजिक व राजकीय लढ्याला प्रारंभ केला.खेडयापाडयात जाऊन समाज बांधवांना जागे करण्याचा, न्याय हक्कासाठी संघर्षास सिध्द करण्याचा प्रयत्न डाॅ.बाबासाहेबांनी केला. ' उठा जागे व्हा, शिक्षण घ्या. आपल्या बांधवांचा उद्धार करा. स्वतचा उध्दार करा. कुणाच्या दयेवर जगू नका असा महान संदेश त्यांनी तरुणांना दिला. 

    १९१९ पासून आंबेडकर सामाजिक व राजकीय कार्यात खऱ्या अर्थाने सहभागी झाले. इ.स.१९२० मध्ये कोल्हापूर संस्थानातील ' माणगाव ' या गावी भरलेल्या ' अस्पृश्यता ' निवारण परिषदेत ते सहभागी झाले होते. सामाजिक कार्य साध्य करण्यासाठी राजकीय क्षेत्रात सहभाग असणे आवश्यक आहे हे त्यांनी ओळखले होते. म्हणून त्यांनी १९२४ साली ' बहिष्कृत हितकारी सभे' ची स्थापना केली. अस्पृश्यांमध्ये अन्याय सहन करण्याची वृत्ती दिसून येत होती. अन्यायाविरुद्ध समाज  जागृत झाला नव्हता म्हणून दलितांमध्ये जागृती घडवून आणणे व निद्रिस्त समाज जागृती करणे हे या संघटनेचे उदिष्ट होते.

      पुढे इ.स. १९२७ मध्ये त्याने "बहिष्कृत भारत "या नांवाचें पाक्षिक सुरू केले. समाज प्रबोधन करणे हा त्या पाक्षिकाचा उद्देश होता. पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला असताना लोकांना सार्वजनिक ठिकाणी पाणी मिळणे अवघड होते.इ.स. १९२७साली महाड येथे चवदार तळे सत्याग्रह त्यांनीं केला आणि महाड येथील तळे  पिण्याच्या पाण्यासाठी खुले करून दिले. इ .स. सन १९२७ मध्ये जातिसंस्थेला मान्यता देणाऱ्या मनुस्मृतीचे दहन केले पुढे १९२८ मध्ये गव्हर्नमेंट लॉ कॉलेज त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले .समाज अंधश्रद्धेने पोखरला होता. धर्मांचा प्रभाव समाजावर पडला होता .देवाचे दर्शन घेण्याचा किंवा मंदिरात जाण्यास मज्जाव होता म्हणून इसवी सन १९२० मध्ये नाशिक येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश देण्यासाठी त्यांनी सत्याग्रह केला.

      इसवी सन १९२० ते १९३२ च्या दरम्यान इंग्लंड मध्ये भरलेल्या गोलमेज परिषदेला ते अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले होते.  त्या ठिकाणी त्यानी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदार संघाची   मागणी केली होती. त्याप्रमाणे इ.स. १९३२ मध्ये इंग्लड प्रधानमंत्री रेंमसे मॅकडोनाल्ड याने जातीय निवाडा जाहीर करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची  वरील मागणी मान्य केली.

      जातीय निर्मितीमुळे अस्पृश्य समाज उर्वरित हिंदू समाजापासून दूर राहील असे त्यांना वाटत होते त्यामुळे जातीय निवाड्यातील या तरतुदीच्या विरोधात गांधीजींनी येरवडा पुणे येथे  प्राणांतिक उपोषण सुरू केले.  त्यानुसार महात्मा गांधी व बाबासाहेब आंबेडकर यांचे आज २५ डिसेंबर १९३२ रोजी एक करार झाला हा करार"  पुणे करार" या नांवाने ओळखला जातो.या करारान्वये  डॉ. आंबेडकरांनी स्वतंत्र मतदार संघाचा आग्रह सोडला. व अस्पृष्यासाठी कायदेमंडळात राखीव जागा असाव्यात असे उभयपक्षी मान्य करण्यात आलं.

        इ. स. सन १९३५ मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची  मुंबई च्या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजचे प्राचार्य म्हणून नियुक्त झाले १९३६ सामाजिक सुधारण्यासाठी राजकीय आधार असावा. यासाठी त्यांनी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला इसवी सन १९४२ साले शेड्युल कास्ट फेडरेशन नांवाचा पक्ष स्थापन केला.इ.स.१९४२ ते १९४६ पर्यंतचा काळात त्यांनी गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळात ' मजूरमंत्री' म्हणून कार्य केले, याशिवाय इ.स.१९४६ मध्ये ' पिंपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना केली. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना मसूदा समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले. त्यांनी अतिशय परिश्रम पूर्वक भारतीय राज्यघटनेचा मसूदा तयार केला आणि त्या योगे भारतीय राज्य घटनेचे निर्मितीत सिंहाचा वाटा उचलला. म्हणून त्यांचा "भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार "अशा शब्दांत उचित गौरव करण्यात आला. याघटना समितीचे काम ९ डिसेंबर १९४६ रोजी सुरू केले.या घटना समितीने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले हे काम २ वर्ष ११ महिने व १७ दिवस चालू होते. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटना प्रत्यक्ष अंमलात आली. स्वातंत्र्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळात त्यांनी 'कायदा मंत्री' म्हणून काम केले होते. इ. स. १९५६ मध्ये नागपूर येथील ऐतिहासिक समारंभात आपल्या असंख्य अनुयायांसह त्यांनीं बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. डाॅ. आंबेडकरांचे काही महत्त्वपूर्ण  ग्रंथ आहेत. त्यांनी ' हू  वेअर शुद्राज ? " दि अनटचेबलस , बुद्ध  ऍण्ड हिज धम्म, दि प्राॅबलेम ऑफ रूपी, थाॅमस ऑन पाकिस्तान हे त्यांनी ग्रंथ लिहिले, तुम्ही जे कार्य करता ते सर्वश्रेष्ठ दर्जाचे आहे की, नाही हे ठरविण्याची एकच परीक्षा आहे ती म्हणजे तुमच्या कार्याने मानवजातीच्या कल्याणात कोणती भर घातली यालाच सर्व महत्व असते. तरच ते कार्य चिरंतर टिकते‌ आणि अशा व्यक्तीच्या कार्याची किर्ती सर्वत्र पसरते आणि म्हणून समाज अशा व्यक्तींची.आठवण सदैव स्मरणात ठेवत असतो.             

          अशा थोर व्यक्तीचा जन्म १४ एप्रिल  १८९१ मध्ये झाला असून  देशात त्यांनी संविधानाच्या माध्यमातून क्रांती घडवली आहे आज संपूर्ण देशभर १३२  वी जयंती साजरी करत आहे  .अशा थोर व्यक्तींच्या जयंती निमित्त सर्व जनतेला वनिता फाउंडेशनच्या वतीने हार्दिक शुभेच्छा लेखणीच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे..

         -  प्रभाकर कांबळे मुंबई (गुणवंत कामगार) ८४२५८९९०४३

No comments:

Post a Comment