किल्ले पारगडवर पुन्हा पाण्याचे दुर्भिक्ष.....तलाव पडले कोरडे, ग्रामस्थांचे स्थलांतर - चंदगड लाईव्ह न्युज

14 April 2023

किल्ले पारगडवर पुन्हा पाण्याचे दुर्भिक्ष.....तलाव पडले कोरडे, ग्रामस्थांचे स्थलांतर

पारगड वरील कोरडा ठाक पडलेला गणेश तलाव.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
    ऐतिहासिक किल्ले पारगड (ता. चंदगड) येथे पुन्हा भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून पाण्याअभावी गडकऱ्यांचे अन्यत्र स्थलांतर सुरू झाले आहे. परिणामी पर्यटकांची संख्याही कमालीची घटली असून ती १० टक्क्यांवर आली आहे.
गडाच्या २४० पायऱ्या चढून फाटक तलावाचे पाणी प्लास्टिक कॅन पोत्यातून नेताना दलित वस्तीतील राजाराम कांबळे.

  तालुक्याचे आमदार राजेश पाटील यांच्या अथक प्रयत्नांनी काही महिन्यांपूर्वी पारगड, नामखोल, मिरवेल ग्रुप ग्रामपंचायत मधील तिन्ही गावांसाठी जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. १ मार्च रोजी चंदगड पंचायत समिती समोर पारगड येथील सामाजिक कार्यकर्ते रघुवीर शेलार व सरपंच संतोष पवार (नामखोल) यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी आमरण उपोषण केले होते. यावेळी पाणीपुरवठा विभागाने रु. ८० लाख ५६ हजार ९०६ रुपये मंजुरीच्या नपापु. कामाची वर्क ऑर्डर उपोषणकर्त्यांच्या हाती देऊन ४ दिवसात कामाला सुरुवात करण्याचे तसेच काम नाही महिन्याच्या आत पूर्ण करण्याचे लेखी पत्र दिले होते. तथापि दीड महिन्यानंतर ही कामाला सुरुवात नाही. किंबहुना अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला पाण्याच्या ठिकाणाचा निश्चित आराखडाच दिला नसल्याचे समजते. या दिरंगाई बद्दल ग्रामस्थांतून तिव्र संताप व्यक्त होत आहे.
      कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण- पश्चिम टोकाला सह्याद्रीच्या कडे कपारीत छत्रपती शिवरायांनी बांधलेल्या किल्ल्यावर साडेतीनशे वर्षानंतरही पाणीपुरवठा सुविधा जैसे थे आहे. गडावरील गणेश, गुंजन, फाटक व महादेव या तलावांचा काय तो ग्रामस्थांना आधार आहे. आज हे सर्व तलाव कोरडे पडले आहेत. यावरून स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही येथील पाणी सुविधेबाबत लोकप्रतिनिधींची अनास्था अधोरेखित होते. गडाखाली राहणाऱ्या दलित वस्तीतील नागरिकांची अवस्था तरी याहूनही भीषण आहे. गडाच्या २४० पायऱ्या चढून सध्या फाटक तलावत असलेले तुटपुंजे खराब पाणी वापरण्याची नामुष्की त्यांच्यावर आली आहे. शिवरायांची आज्ञा शिरसावंद्य मानून गेली साडेतीनशे वर्षे गड सांभाळणाऱ्या गडकऱ्यांच्या नशिबी आलेले हे दुष्टचक्र  थांबवण्यासाठी नळ पाणी योजना तातडीने कार्यान्वित करावी. यासाठी आमदार राजेश पाटील व संबंधित विभागाचे अधिकारी यांनी जाणीवपूर्वक लक्ष घालावे अशी मागणी शिवप्रेमी नागरिक, पर्यटक, पारगड ग्रामस्थ व पंचक्रोशीतून होत आहे. 

No comments:

Post a Comment