कोवाडला स्वतंत्र पोलीस स्टेशन होईपर्यंत पुरेसे कर्मचारी द्या..! शिवसेनेचे जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

04 April 2023

कोवाडला स्वतंत्र पोलीस स्टेशन होईपर्यंत पुरेसे कर्मचारी द्या..! शिवसेनेचे जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन

 

जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांना निवेदन देताना शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
 कोवाड (ता. चंदगड) पोलीस आऊट पोस्ट (दूरक्षेत्र) येथे अपुरे कर्मचारी असल्याचा निषेध करत येथे स्वतंत्र पोलीस स्टेशन च्या मागणीसाठी शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या वतीने २० फेब्रुवारी रोजी निदर्शने करून याबाबत चे निवेदन चंदगडचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांना दिले होते. तथापि परिस्थितीत काहीच फरक पडला नसल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांना पुन्हा निवेदन दिले आहे.
     चंदगड तालुक्याच्या पूर्व भागातील ५०- ६० गावातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी चंदगड पोलीस ठाणे अंतर्गत ५० वर्षांपासून कोवाड येथे पोलीस दुरुक्षेत्र कार्यरत आहे. हा परिसर कर्नाटक राज्य सीमेलगत असल्याने  शेकडो अवैध धंदे, अवैध वाहतूक, तस्करी, चोऱ्या, दरोडे, मारामाऱ्या आदी गुन्हेगारीच्या अनेक घटना वारंवार घडत असतात. त्यामुळे अनेक वर्षांपासून येथे स्वतंत्र पोलीस स्टेशनची मागणी होत असताना पोलिस प्रशासनामार्फत पूरेसे पोलीस कर्मचारी न देता  आहेत त्यांना चंदगडला ड्युटी लावली जाते. येथे कोणीच कर्मचारी नसल्याने बहुतांश वेळा किरकोळ कारणासाठीही नागरिकांना ४० किमी वरील चंदगडला हेलपाटे मारावे लागतात. यात नागरिकांना  मनःस्ताप व आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. नागरिकांची गैरसोय टाळावी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांना निवेदन दिले आहे यात स्वतंत्र पोलीस स्टेशन होईपर्यंत नियमानुसार पुरेसे व कायमस्वरूपी कर्मचारी द्यावेत. २४ तास तक्रार देणे- घेणे साठी पोलीस अधिकारी असावेत, पोलीस चौकी व आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, ते डी वाय एस पी यांनी महिन्यातून एकदा तपासावेत आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.No comments:

Post a Comment