----------------------------------------------------------------------------------
लाकुरवाडी येथे खडकाळ माळरानावरील सहा गुंठे जमिनीत मिरचीचे पावणेदोन लाखाचे उत्पन्न - तानाजी बाळू दळवी (प्रगतशील शेतकरी)
कार्य -
चंदगड तालुक्यातील भात आणि ऊस या दोन पिकात गुरफटून पडलेल्या शेतकऱ्यांना खडकाळ माळरानावरील सहा गुंठे जमिनीत मिरचीचे पावणेदोन लाखाचे उत्पन्न घेऊन लाकूरवाडी येथील तानाजी बाळू दळवी यांनी जागे केले. बीए, बीपीएड पदवीधारक असलेल्या दळवी यांनी पदवीची पुंगळी घेऊन नोकरीसाठी वणवण भटकंती केली. चार ठिकाणी नोकरीही केली. पण तुटपुंज्या पगारात स्वतःचा उदरनिर्वाह चालत नाही, तिथे कुटुंबाचा कसा चालवणार? याची भ्रांत त्यांना पडल्यामुळे ते वडिलोपार्जित शेतीकडे वळले आणि चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीतील एक तज्ञ मिळाला. शेतीत भाजीपाला पिकाचे विक्रमी उत्पन्न घेणारा प्रयोगशील शेतकरी म्हणून त्यांचा बोलबाला झाला. अनेक शेतकरी त्यांच्या शेतीला भेटी देऊ लागले. तालुका कृषी विभागाने त्यांच्या या कार्याची दखल घेतली आहे. नगन्य पगाराच्या नोकरीसाठी स्वाभिमान गहाण ठेवणाऱ्या तरुणांसमोर हे उत्तम उदाहरण आहे.
----------------------------------------------------------------------------------
हजारो विद्यार्थ्यांना घडविणारे आदर्श शिक्षक - आर. डी. पाटील
(अध्यापक - रामलिंग हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज तुडिये)
कार्य -रामलिंग हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज तुडिये येथे अध्यापक म्हणून कार्यरत असलेले आर. डी. पाटील यांचे शिक्षण BA. BEd असून ते गणित, बुद्धिमत्ता व एमसीसीचे शिक्षक आहेत. त्यांची एकूण सेवा आतापर्यंत ३५ वर्षे पूर्ण झाली आहे. माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षा, NNMS, नवोदय परिक्षा यासाठी सतत १३ वर्षे मार्गदर्शन करून १०० हून अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून दिली. राज्य गुणवत्ता यादीतही त्यांचे विद्यार्थी प्रथम आले आहेत. उत्कृष्ट एमसीसी संचलन मार्गदर्शक आहेत. या स्पर्धेत जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. संगीत क्षेत्रातही त्यांचे भरीव कार्य असून उत्कृष्ट शास्त्रीय हार्मोनियम वादक व ढोलकी पटू म्हणून प्रसिद्ध आहेत. संगीत भजन स्पर्धेत १०० हून अधिक बक्षिसे पटकावली, नाटिका लेखन, दिग्दर्शन, अभिनय व संगीत नाट्य परीक्षक तसेच शिक्षक म्हणून तालूका ते राज्य स्तरीय साधन व्यक्ती म्हणूनही ते परिचित आहेत त्यांच्या सामाजिक शैक्षणिक संगीत क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार यापूर्वी प्राप्त झाले आहेत.
वनसंपदेच्या संवर्धनासाठी केलेले कार्य आदर्शवत - सागर सर्जेराव पोवार, वनरक्षक (वन परिक्षेत्र कार्यालय चंदगड)
कार्य -गेल्या चारपाच वर्षांत चंदगड तालुक्यामधील सेवेत वनरक्षक सागर पवार यांनी एक वेगळा ठसा उमटवला आहे. येथील वनसंपदेच्या संवर्धनासाठी त्यांनी केलेले कार्य आदर्शवत ठरले आहे. आपले कर्तव्य पार पाडत असताना अवैध वृक्षतोड, अवैध वाहतूक, वनक्षेत्रातील अतिक्रमणे, वन्य प्राण्यांची शिकार याला आळा घालनेकामी ३ शिकारीच्या केसेस दाखल करुन संशयितांना मुद्देमालासह पकडून त्यांच्यावर न्यायालयात सुनावणी सुरु आहे. त्यांचे कार्य इतर कर्मचाऱ्यांना प्रेरणा व दिशादर्शक आहे.
वन्यप्राण्यांच्याकडून शेतपिकाचे व मालमत्तेचे होणारे नुकसानीची तात्काळ पाहणी करुन संबंधित शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी स्वत: पिक नुकसानीची प्रकरणे वरिष्ठ कार्यालयाकडे घेवून जावून तात्काळ मंजूर करुन दिली. वन्यप्राणी मानवी वस्तीत आल्यानंतर चांगले नियोजन करुन कोणतीही जीवितहानी न होता वन्य प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवातास पाठविण्याचे कामगिरी बजावली. अडकूर येथे भरवस्तीत टस्कर हत्ती आल्याची माहिती मिळताच इतर शासकीय यंत्रणेशी संपर्क करुन वनविभाग व इतर यंत्रणेच्या मदतीने घटप्रभा नदीतील पाण्याच्या मार्गे आजरा येथील जंगलामध्ये पाठवले. गावात आलेल्या जखमी प्राण्यांना पकडून त्यांच्यावर उपचार करुन पुन्हा त्यांना जंगलात सोडले. शेतकऱ्यांना नुकसानीची प्रकरणे आॅनलाईन करताना अडचणी येत असल्याने स्वत: हि प्रकरणे तयार करुन त्यांना आॅनलाईन करुन देवून तातडीने नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. तसेच वनक्षेत्रात केलेली कामे उत्कृष्ट दर्जाची आहेत.
-----------------------------------------------------------------------------------
कोरोनाच्या काळातही उत्तम काम करणारे - चंद्रकांत अरुण बोडरे (गटविकास अधिकारी, पंचायत समिती चंदगड)
कार्य -गेल्या तीन वर्षात चंदगड तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी म्हणून चंद्रकांत बोडरे यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. ते चंदगड तालुक्यात रुजू झाले. तेव्हा कोरोना महामारीचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत होता. या काळात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी पंचायत समिती मधील सर्व कर्मचारी, शिक्षक, शिक्षिका, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका जिल्हा परिषद संबंधित सर्व विभागाचे कर्मचारी यांना सोबत घेऊन चंदगड तालुक्यातील कोरोनाचा प्रकोप आरोग्य विभागाच्या सहकार्याने बोडरे यांनी सक्षमपणे पेलले. पंचायत समितीच्या अंतर्गत विविध विभागात अनेक रिक्त पदे आहेत. अपुऱ्या कर्मचाऱ्यांसह तालुक्याचा प्रशासकीय गाडा समर्थपणे चालवण्यात यांचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्र विकास सेवा मधून २००९ मध्ये त्यांची बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून महागाव तालुका महागाव जिल्हा यवतमाळ येथे सेवा सुरू झाली. जून २०१५ ते २०१७ कागल येथे गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त चार्ज सांभाळला. २०१७ ते २०२० गटविकास अधिकारी म्हणून पंचायत समिती धडगाव तर सप्टेंबर २०२० पासून ते चंदगड पंचायत समितीकडे गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
-----------------------------------------------------------------------------------
रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा माणारे - डॉ. बी. डी. सोमजाळ
(तालुका आरोग्य अधिकारी तथा वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र अडकूर)
कार्य -तालुक्यातील गरीब रुग्णांसाठी देवदूत ठरलेले डॉक्टर बी. डी. सोमजाळ यांनी मिरज मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस पदवी मिळवली. नंदुरबार जिल्ह्यात ५ वर्षे सेवेनंतर अडकूर येथे १७ वर्षे वैद्यकिय अधिकारी म्हणून उत्कृष्ट कार्याचा ठसा उठवला आहे. सध्या तालुका आरोग्य अधिकारी पदभारही सांभाळत आहेत. त्यांच्या रुग्णाभिमुख सेवेमुळे अडकूर हे जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण संख्या असलेले आरोग्य केंद्र बनले आहे. चांगल्या टीमवर्कमुळे त्यांच्या आरोग्य केंद्राला आनंदीबाई जोशी पुरस्काराने नुकतेच गौरवण्यात आले असून सुंदर माझा दवाखाना मोहिमेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. त्यानी २२ वर्षांच्या सेवेत १५ हजाराहून अधिक स्त्री नसबंदी तर १० हजाराहून अधिक पुरुष नसबंदी बिनाटाका शस्त्रक्रिया यशस्वी करून विक्रम केला आहे. त्यामूळेच शासनाने डॉ. सोमजाळ यांना कुटूंब नियोजनाचे मार्गदर्शक म्हणून नियूक्ती केली आहे. तालूका आरोग्य अधिकारी म्हणूनही त्यांची कारकीर्द उल्लेखनीय ठरत आहे. कोरोना काळात अहोरात्र काम करणारे डॉ. सोमजाळ आजही रोज ३०० रुग्णांची सेवा करतात. या कार्यात पत्नी डॉ. नजमिन सोमजाळ यांचे सहकार्य लाभत आहे.
----------------------------------------------------------------------------------
लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी झटणारे आदर्श पत्रकार - तातोबा भिकाजी गावडा/पाटील (मुगळी, ता. चंदगड)
कार्य -गेली ६ वर्षे तातोबा गावडा हे अन्वेषण ग्रुप ऑफ मिडीयाचे पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. चंदगड तालुका पत्रकार संघाचे सदस्य म्हणूनही त्यांचे संघटन कार्यात योगदान आहे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. तो सुदृढ राहावा यासाठी पत्रकार संरक्षण कायद्याबाबत जनजागृती करण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून चंदगड तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने अनेक सामाजिक व राजकीय विषय मांडण्याबरोबरच विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य त्यांनी आपल्या लेखणीतून केले आहे. सामाजिक कार्यात ही ते अग्रेसर आहेत. गेली पाच वर्षे भिमगर्जना मानवाधिकार संघटनेचे चंदगड तालुका अध्यक्ष म्हणून अनेक पीडित कुटुंबांना कायदेशीर सल्ला व न्याय दिला आहे. सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्यांचे सुरू असलेले कार्य असेच पुढे सुरू राहावे.
--------------------------------------------------------------
1 comment:
बोडरे साहेब आपला आम्हास अभिमान आहे.
Post a Comment