कोवाड ग्रामपंचायत मार्फत ग्रामविकास अधिकारी, लक्ष्मी कांबळे, नंदा कांबळे यांचा सन्मान - चंदगड लाईव्ह न्युज

31 May 2023

कोवाड ग्रामपंचायत मार्फत ग्रामविकास अधिकारी, लक्ष्मी कांबळे, नंदा कांबळे यांचा सन्मान

कोवाड ग्रामपंचायत मार्फत ग्रामविकास अधिकारी यांचा सांस्कृतिक भवन कोवाड येथे सन्मान करताना मान्यवर.
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
   स्मार्ट ग्राम पंचायत कोवाड (ता. चंदगड) यांच्यावतीने ग्रामविकास अधिकारी जी. एल. पाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त भावपूर्ण निरोप सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी जि. प. सदस्य कल्लाप्पाण्णा भोगण तर प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे उपस्थित होते.
  सुरुवातीस अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे तसेच छत्रपती शिवराय व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक सरपंच अनिता भोगण यांनी केले. यावेळी गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, ग्रामपंचायत सदस्या रंजना पाटील आदींची भाषणे झाली. मान्यवरांच्या हस्ते ग्रामविकास अधिकारी जी एल पाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त सपत्नीक सत्कार करण्यात आला.  आपल्या ३० वर्षाच्या सेवेत जी एल पाटील यांनी बटनंगले, नेसरी गावठाण सह चार गावांना संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कार, हागणदारी मुक्त पुरस्कार तर कोवाड सह दोन ग्रामपंचायतींना स्मार्ट ग्राम पुरस्कार मिळवून दिला. शासनाच्या वतीने दोनदा आदर्श पुरस्काराने सन्मानित झालेले ते जिल्ह्यातील एकमेव ग्रामसेवक आहेत.
  कार्यक्रमात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त शासनाच्या निर्देशानुसार गावातील सामाजिक कार्यात अग्रेसर महिलांसाठी दिला जाणारा पुरस्कार यंदा सफाई कामगार म्हणून तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या लक्ष्मी सुबराव कांबळे व नंदा अनंत कांबळे यांना देऊन ग्रामपंचायतीने त्यांचा सन्मान केला. कार्यक्रमास गावातील शिक्षण, आरोग्य, पोस्ट, पोलीस, सहकारी संस्था विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामा यादव, उपसरपंच पुंडलिक जाधव, पशुधन विकास अधिकारी डॉ. पवार, सर्व ग्रामपंचायत सदस्य, व्यापारी संघटना, जी एल पाटील यांच्या घुल्लेवाडी गावातील मित्रमंडळी, नातलग, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या पूर्ततेसाठी ग्रामपंचायत कर्मचारी विष्णू जोशी, परसू जाधव, नारायण कांबळे, बाळू माने, भैरव कांबळे, बाळकृष्ण चोपडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग जाधव व भैरू भोगण यांनी केले. आभार सुवर्णा नेसरकर यांनी मानले.


No comments:

Post a Comment