राज्यातील ४९,३३३ सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ब्रेक...! - चंदगड लाईव्ह न्युज

29 June 2023

राज्यातील ४९,३३३ सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ब्रेक...!

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
   महाराष्ट्र राज्यातील सहकारी संस्थांच्या पंचवार्षिक निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. तथापि जाहीर झालेला कार्यक्रम पूर्णपणे पावसाळ्यातील असल्याने नैसर्गिक आपत्तीमुळे निवडणूक प्रक्रियेत बाधा उत्पन्न होऊ शकते. हे टाळण्यासाठी नवीन कार्यक्रमानुसार आता या निवडणुका २३ सप्टेंबर २०२३ नंतर घेण्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.
 राज्यातील ८२ हजार ६३१ सहकारी संस्था निवडणुकीस पात्र होत्या. त्यापैकी २५० पेक्षा कमी सदस्य असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था वगळून उर्वरित ४९ हजार ३३३ सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पावसाळा संपेपर्यंत ब्रेक लागला आहे. या निवडणुका आता ३० सप्टेंबर नंतर होतील, असे पत्रक अनिल चौधरी कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी काढले आहे. 
पावसाळ्यात अतिवृष्टीने जनजीवन व वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत सभासद  मतदानापासून वंचित राहू शकतात हे गृहीत धरून सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम १५७ अन्वये कलम ७३ क मधील तरतुदीनुसार निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. यातून २५० किंवा त्यापेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था तसेच ज्या संस्थांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे परंतु अध्यक्ष उपाध्यक्ष  निवड होणे बाकी आहे अशा संस्था वगळण्यात आलेल्या आहेत.

No comments:

Post a Comment