चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
कालपासून महाराष्ट्र राज्यात बऱ्यापैकी हजेरी लावलेला पाऊस उद्यापासून राज्यात मुसळधार बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. संपूर्ण मृग नक्षत्र कोरडे गेल्यामुळे १९७२ च्या दुष्काळाची चाहूल महाराष्ट्राला भेडसावत होती. तथापि कालपासून वरून राजाने बऱ्यापैकी कृपादृष्टी केली आहे. यामुळे बळीराजासह सर्व चराचर सृष्टीत आनंदाची लहर पसरली आहे.
गेल्या काही तासांतच मान्सून ने बहुतांश देश काबीज केला आहे. हवामान खात्याने २६ ते २९ जून दरम्यान राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाचा इशारा दिला असून कोकणात सोमवार व मंगळवार दि. २६-२७ दोन दिवस ऑरेंज अलर्ट दिला आहे. २३ जून रोजी बंगालच्या उपसागरातून थेट विदर्भात मान्सून दाखल झाला. २४ तारखेला ६० टक्के तर २५ जून रोजी ९० टक्के देश मान्सून ने व्यापला. पाणीटंचाई आणि उकाड्याने हैराण झालेल्या देशवासियांना हा दिलासा ठरला आहे. आत्तापर्यंतच्या इतिहासात इतक्या कमी वेळेत मान्सून ने कधीच देश व्यापलेला नव्हता असे नमूद करताना पुणे वेधशाळेने दिनांक २६ ते २९ मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे. २९ नंतर पुढील दोन तीन दिवस पावसाचा जोर कमी राहील.
No comments:
Post a Comment