पोलिस ठाण्यातील तक्रारीत नाव घातल्याच्या संशयावरून पोवाचीवाडी येथील पोलीस पाटलावर कोयत्याने वार करून खुन - चंदगड लाईव्ह न्युज

25 June 2023

पोलिस ठाण्यातील तक्रारीत नाव घातल्याच्या संशयावरून पोवाचीवाडी येथील पोलीस पाटलावर कोयत्याने वार करून खुन

 

संदीप ज्ञानदेव पाटील

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

     कौटुंबिक वादातील पोलीस तक्रारीत नाव घातल्याच्या रागातून पोवाचीवाडी येथील पोलिस पाटील यांचा कोयता व खुरप्याने डोकीत व मानेवर गंभीर वार करून ठार मारल्याची दुदैवी घटना पोवाचीवाडी (ता. चंदगड) येथील देवचारंगी नावाच्या शेतात शनिवारी रात्री घडली. संदीप ज्ञानदेव पाटील (वय वर्ष ४१)असे मयत पोलीस पाटलाचे नाव आहे.

     याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, मार्च २०२३ मध्ये पोवाचीवाडी गावामध्ये रोहीत निवृत्ती पाटील व शांताराम आप्पा गावडा यांचे देवकांडगाव (ता. आजरा) येथील नातलग यांचेत मारामारी झाली होती. त्यावेळी रोहीत निवृत्ती पाटील यांचेसह त्यांचे भावकीतील लोकांच्या विरुध्द चंदगड पोलीस ठाणेत गुन्हा नोंद झाला होता. त्या तक्रारीमध्ये मयत पोलीस पाटील संदीप पाटील यांने नावे तक्रारीमध्ये घातली असा गैरसमज रोहीत निवृत्ती पाटील व त्यांचे भावकीतील लोकानी करुन घेतल्या मुळे ते पाटील कुटुंबातील लोकांशी बोलत नव्हते.

         दरम्यान शनिवारी रात्री संशयित आरोपी रोहित निवृत्ती पाटील याच्याशी आपलं भांडण सुरू असून त्याला समजावून सांगण्यासाठी सुरेश गुरव याने फोन करून पोलिस पाटील संदीप याला बोलावून घेतले. त्यानुसार पोलिस पाटील संदीप हे गुरव यांच्या देवचारंगी नावाच्या शेतात संशयित रोहित निवृत्ती पाटील, निवृत्ती राजाराम पाटील, अरूण राजाराम पाटील व योगेश अरुण पाटील यांना समजावण्यासाठी गेले असता जुन्या वादात पोलिस तक्रारीत नाव घातल्याच्या रागातून त्यांनी संगनमत करून संदीप पाटील यांच्या हातावर, मानेवर, डोकीत कोयता व खुरप्याने सपासप वार करून ठार मारले.‌ या घटनेमुळे  तालुक्यात खळबळ उडाली आहे.‌ संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.मयत संदीप याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. याबाबतची फिर्याद मयताचे वडील ज्ञानदेव पाटील यांनी चंदगड पोलीसात दिली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष घोळवे करत आहेत. 


आरोपींना अटक करा, तेव्हाच मृतदेह उचलणार

       मयत संदीप पाटील हे चंदगड तालुका पोलीस पाटील संघटनेचा सदस्य होते. सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या संदीप कोयत्याने वार करून खुन केल्याने हळहळ व्यक्त होत आहे. संदीपवर हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींना जोपर्यंत अटक करत नाहीत. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास चंदगड तालुका पोलीस पाटील संघटना व नातेवाईकांनी नकार दिला. त्यामुळे पोलिसांसमोर आरोपींना अटक करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

No comments:

Post a Comment