कोवाड- माणगाव रस्त्यावर खड्ड्यांची मालिका, पॅचवर्क कामात दिरंगाई! शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा - चंदगड लाईव्ह न्युज

16 June 2023

कोवाड- माणगाव रस्त्यावर खड्ड्यांची मालिका, पॅचवर्क कामात दिरंगाई! शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

 

खड्डेमय झालेला कोवाड ते माणगाव मार्ग.

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

        चंदगड तालुक्याच्या पूर्व भागातील अत्यंत महत्त्वाचा वर्दळीचा कोवाड ते माणगाव रस्ता पुन्हा खड्डेमय झाला आहे. या रस्त्याचे डांबरी पॅचवर्क मंजूर असल्याचे समजते मात्र पावसाळा आला तरी कामाची कोणतीच हालचाल दिसत नाही. हे काम दोन दिवसात सुरू न केल्यास उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल. असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग चंदगड यांना निवेदन देताना शिवसेना तालुकाप्रमुख लक्ष्मण मनवाडकर,  मारुती कांबळे, संदीप पाटील, गजानन पाटील, पी व्ही मुरकुटे आदी शिवसेना पदाधिकारी.

      कोवाड, माणगाव ते पाटणे फाटा हा चंदगड तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. गोवा, सावंतवाडी, आंबोली परिसराला दड्डी, हत्तरगी, गोकाक पर्यंत जोडणाऱ्या पर्यायाने महाराष्ट्र गोवा व कर्नाटक राज्यांना जोडणाऱ्या या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. यातील अनेक बोजड वाहनांमुळे रस्त्यात वारंवार खड्डे पडत असतात. सुरुवातीला लहान असलेले खड्डे वेळेत पॅचवर्क न केल्यास मोठे रूप धारण करून अपघातांना निमंत्रण मिळते. या रस्त्यावर एप्रिल मे महिन्यात डांबरी पॅचवर्क होणे अपेक्षित होते तथापि ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे पावसाळा आला तरी काम रखडले आहे. सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांचे इकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. सध्या पावसाने ओढ दिल्याने पॅचवर्क चे काम होऊ शकले असते. पण याकामी टाळाटाळ होताना दिसत आहे. सदरचे काम दोन दिवसात सुरू न झाल्यास उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने उग्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या रस्त्याची अशी अवस्था असताना याच्याशी संलग्न असलेल्या कोवाड ते  कामेवाडी व कोवाड ते राजगोळी या रस्त्यांचीही मोठी दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावरून वाहन चालवणे म्हणजे  मृत्यूला आमंत्रित करण्या सारखी परिस्थिती आहे. 

        याबाबतचे निवेदन मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग चंदगड यांना देण्यात आले असून यावर तालुकाप्रमुख लक्ष्मण  शिवाजी मनवाडकर, उप तालुकाप्रमुख विनोद मनोहर पाटील व रवींद्र रामचंद्र पाटील आदींच्या सह्या आहेत. चंदगड तालुक्याच्या पूर्व भागातील या महत्त्वाच्या रस्त्यांची दुरुस्ती व्हावी अशी मागणी मार्गावरील प्रवासी व वाहनधारकातूनही गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे.

No comments:

Post a Comment