चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील भजन सम्राट म्हणून ओळखले जाणारे व्यक्तीमत्व म्हणजे वैजनाथ गजानन बर्वे (भटजी, वय -६० वर्षे) होय. त्यांचे काल रात्री आकस्मिक निधन झालेने चंदगड तालुक्यातील सांप्रदायिक कीर्तन, भजन क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
आपल्या पहाडी आवाजातील सुमधूर गायकीने महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा राज्यातील वारकरी संप्रदायातील भजन प्रेमींच्या परिचयाचे निगर्वी, सालस, प्रामाणिक आणि प्रतिभावान व्यक्तिमत्व श्री बर्वे भटजी महाराज यांचे काल सायंकाळी अल्पशःआजाराने दुःखद निधन झाले.
आपल्या सहज सुंदर गायकीने अनेकांच्या मनावर त्यांनी भुरळ पाडली. राग मिश्रण करून मूळ पदावर येणं ही तर त्यांची खासीयत. सूरपेटीवर सळसळणाऱ्या बोटांची जादुगिरी पाहतांना आणि तेवढ्याच ताकतीने तबल्यावर पडणारी समेची भली मोठी थाप ऐकतांना नकळत तोंडातून शब्द बाहेर पडायचे अरे वा !.
तिन्ही सप्तकामध्ये सफाईदारपणे गातांना एका सप्तकातील 'सा' वरून दुसऱ्या सप्तकातील 'सा' लावतांना घेतलेला मिंड असो वा गातांना घेतलेल्या हरकती आणि आलापी, ताना ऐकतांना साक्षात नादब्रम्ह उभा राहायचा.
दत्त जयंती निमित्त श्रीपादवाडी येथे आयोजित एका कार्यक्रमात त्यांच्या गायकीवर मुंबईकर भजन प्रेमी अक्षरशः फिदा झाले. जो तो त्यांच्यावर बक्षिसांची खैरात करू लागला. एवढं कौतुक आणि प्रसिद्धी मिळून सुद्धा त्यांचे पाय नेहमी जमिनीवर राहिले. त्यांना 'ग ' ची बाधा कधी ही झाली नाही. मैफीलीमध्ये सर्वांना तेवढ्याच आदराने सांभाळून घ्यायचे. हरिनाम सप्ताह असो किंवा पारायण असो प्रथम संधी मिळाली नाही म्हणून निघून जाणारी अनेक भजनी मंडळे मी पाहिली आहेत. परंतु पहाटेपर्यंत थांबणारे बर्वे भजीही मी पाहिले आहेत. आजच्या भजनी मंडळांनी हा आदर्श त्यांच्याकडून घेण्यासारखा आहे.
पारायण किर्तन - भजन तसेच भजनीं स्पर्धांच्या निमित्ताने त्यांच्या सहवासात राहण्याचे भाग्य माझ्यासह अनेकांना लाभले. तालुक्यातील अनेक गावच्या भजनी मंडळांना त्यांनी विशेष सहकार्य केले आहे. ते गायन - वादन करताना कधी कुणाला रागावले नाहीत.उलट ते दुसऱ्या ला प्रोत्साहन देत. कार्यक्रम कुठेही असू देत वेळेचे भान राखून त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहायचे. कीर्तनाची पहिली चाल आणि शेवटी भैरवी त्यांच्या तोंडूनच ऐकायला मिळायची. आणि कोणताही अभंग असला तरी त्या अभंगाचे पाठांतर आणि रागाची मांडणी, विस्तार, करण्यात त्यांचा हातखंडा होता. अनेक गावांमध्ये त्यांनी भजनी मंडळीना शिकवले.
त्यांच्या जन्मगावी देवरवाडी (ता. चंदगड) येथे त्यांनी लहानपणापासूनच गायण -हार्मोनियम वादन, तबलावादनाचे शिक्षण घेतले.आपला भटजी कामाचा व्यवसाय करताना अनेक गावातील लोकांचा संपर्क वाढला. सत्यनारायण पूजा असेल किंवा लग्न कार्य अशा अनेक कारणांनी त्यांचा जनसंपर्क वाढत गेला. चंदगड तालुक्यातील कानूर भागात तसेच महिपाळगड, कोवाड, किणी-कर्यात पंचक्रोशीत आणि माणगाव, डुक्करवाडी, अडकुर, तुर्केवाडी आदी अनेक गावांमध्ये ते भजन आणि कीर्तनासाठी पारायणातून आपली हजेरी लावत असत. अमुक एवढीच बिदागी द्या, असा त्यांनी कधीच कुणाकडे अट्टहास केला नाही.
देवाचे (विठ्ठलाचे) नामस्मरण करणे हा त्यांनी उदात्त हेतू ठेवून बोलावलेल्या व्यक्तिच्या शब्दाला जागून ते सन्मानाने उपस्थित राहायचे. डोळ्यावरती चष्मा, गळ्यात पांढरा सदरा असा त्यांचा पोशाख. त्यांचे विशेष प्रेम होते. त्यांच्या गायकीने आमच्या सारख्या अनेक नवशिक्याना जवळून शिकविले आहे. तर तळगुळी,राजगोळी, आणि इतर गावातील भजनी मंडळीना त्यांनी मानाच्या स्पर्धांमध्ये यश मिळवून दिले आहे.
No comments:
Post a Comment